लोकमत न्यूज नेटवर्करामटेक : मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान विधानसभा निवडणुकीतील निकालांमुळे केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभवाची भीती वाटत आहे. या दोन्ही सरकारने साडेचार वर्षात कोणतीही कामे केली नाहीत. त्यामुळे मतदारांना मते माण्याची सोय राहिली नाही. याच भीतीपोटी मोदी व फडणवीस यांनी आता ‘जुमलेबाजी पार्ट - २’ सुरू केली आहे, अशी परखड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.काँग्रेस पक्षाच्यावतीने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या पाचव्या टप्प्याला नागपूर येथील दीक्षाभूमीवरून गुरुवारी सकाळी सुरुवात करण्यात आली. ही यात्रा दुपारी कामठी मार्गे रामटेक शहरात पोहोचली. रामटेक शहरात यात्रेचे जाहीर सभेत रुपांतर झाले. या वेळी चव्हाण बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, आ. विजय वडेट्टीवार, आ. नसीम खान, माजी मंत्री वसंतराव पुरके, अ.भा.काँग्रेस कमिटीचे सचिव व राज्याचे सहप्रभारी आशिष दुआ, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, मुनाफ हकीम, डॉ. अमोल देशमुख, अनंतराव घारड, पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे आदी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, देशात सध्या परिवर्तनाचे वारे वाहात आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान या या तिन्ही राज्यात काँग्रेसने सत्ता सांभाळताच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. फडणवीस सरकाने दोन वर्षांपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले नाही. महाराष्ट्र सध्या दुष्काळात होरपळत आहे. मात्र, शासनाच्यावतीने कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या जात नाही. शेतमालाचे भाव, पिण्याचे पाणी, गुरांचे वैरण, रोजगाराची कमतरता, बंद असलेले सोयाबीन, तूर, धान खरेदी केंद्र, विदर्भातील नवीन उद्योगाची वानवा, बेरोजगारी, नोटाबंदी यासह अनेक समस्यांनी आता गंभीर रूप धारण केले आहे. मात्र, हे प्रश्न सोडविण्यात भाजपा सरकार फेल ठरले, असा ठपका त्यांनी ठेवला.राजेंद्र मुळक यांनी प्रास्ताविकातून जनसंघर्ष यात्रेचा हेतू विशद केला. उदयसिंग यादव यांनी आभार मानले.