नागपूर : नागपूरकर आदरातिथ्याबाबत कुठलीच कसर सोडत नाहीत. पाहुणे घरी आले म्हटले की साजशृंगार जेवण असते. त्यात वैदर्भीय व्यंजनं आलीच समजा. 'जी- २०' अंतर्गत 'सी-२० समिट'ला आलेल्या देशविदेशातील पाहुण्यांसाठी खास डिनर ठेवण्यात आले. त्यात पाहुण्यांना भावली ती झुनका भाकर, पाटवडी रस्ता अन् पुरणपोळी. तुपाची धार पडताच सर्वांच्याच जिभेवर पुरणपोळीने अधिराज्य गाजवले. पाहुणे म्हणाले... वाव नागपूर... ग्रेट... ग्रेट. सुपर डिनर ! धिरडे, बाजरी भाकरी, बटाटावडा, पनीर टिक्का, मसाला भात या व्यंजनांचाही यात समावेश होता. यावेळी खास पाहुण्यांसाठी लोकनृत्य, लावणी असे कलाप्रकार कलावंतांनी सादर केले.
'जी-२०' अंतर्गत 'सी-२० समिट'ला नागपुरात सोमवारी उत्साहाने सुरुवात झाली अन् देशविदेशातून आलेल्या प्रतिनिधींना येथील आदरातिथ्याने प्रभावित केले. विशेष म्हणजे उदघाटन सोहळ्यादरम्यान नागपूरच्या भूमीचे महत्त्व विशद केल्यावर अनेक जणांच्या चेहऱ्यावर पुण्यभूमीत आल्याचे भाव होते. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व 'सी-२०'चे संरक्षक डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता हे विशेष. विनय सहस्रबुद्धे यांनी माता अमृतानंदमयी देवी यांच्या मातृभाषेच्या आग्रहाच्या पावलावर पाऊल टाकत मराठीत भाषणाला सुरुवात केली. त्यांनी नागपूरची भूमी भारत देशाच्या संकल्पनेशी कशी जुळली आहे यावर प्रकाश टाकला. सोबतच दीक्षाभूमी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कर्मभूमी असून या दोन्हीमुळे देशाला काय मिळाले हे सांगितले. यानंतर फडणवीस यांनी नागपूरच्या एकूण महत्त्वावरच भाष्य केले.
भारतीय पेहरावात अनेक विदेशी अतिथी
'सी-२०'मध्ये सहभागी झालेले अनेक विदेशी अतिथी चक्क भारतीय पेहरावात उपस्थित झाले होते. भारतीय संस्कृतीने आम्हाला प्रभावित केले असून येथील आदरातिथ्य जगात भारी' असल्याचा त्यांचा सूर होता.
वैदर्भीय व्यंजने, जुगलबंदी अन् पारंपरिक नृत्य
वैदर्भीय व्यंजने, जुगलबंदी आणि नृत्य यांचा त्रिवेणी संगम सोमवारी ‘जी-२०’ अंतर्गत ‘सी-२०’ परिषदेसाठी आलेल्या पाहुण्यांना पाहायला मिळाला. तेलंगखेडी येथील गार्डनमध्ये दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे तर नागपूर सुधार प्रन्यासतर्फे गाला डिनरचे आयोजन करण्यात आले.
गाला डिनरच्या पूर्वी मान्यवरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात बासरी, सितार, व्हायोलिन, संतूर आणि तबला यांची जुगलबंदी वैदर्भीय कलाकारांनी सादर केली. अरविंद उपाध्ये यांनी बासरी, शिरीष भालेराव (व्हायोलिन), वात्मिक धांडे (संतूर), अवनींद्रा शेओलिकर (सीतार), संदेश पोपटकर यांनी तबल्याची जुगलबंदी सादर केली.
जुगलबंदीनंतर विदर्भाची लोकधारा या कार्यक्रमांतर्गत गोंधळ, लावणी सादर करण्यात आले. यवतमाळ येथील डॉ.राहुल हळदे आणि त्यांच्या चमूने गोंधळ आणि लावणी सादर केली, तर सुरेश घोरे आणि त्यांच्या चमूने चितकोर हे नृत्य सादर केले. शहनाई वादन विज्ञानेश्वर खडसे यांनी केले.
सी-२० परिषदेच्या अध्यक्षा माता अमृतानंदमयी, आयोजन समितीचे संयोजक विनय सहस्त्रबुद्धे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह देश-विदेशातील पाहुणे आदी यावेळी उपस्थित होते. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले.
झुणका भाकर अन् पुरणपोळीवर ताव
गाला डिनरचे आयोजन नागपूर सुधार प्रन्यासमार्फत करण्यात आले. यात वैदर्भीय खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली. यात धिरडे, ज्वारीची भाकरी, बाजरी भाकरी, पुरणपोळी या पारंपरिक मराठी खाद्यपदार्थांची, तसेच बटाटावडा, पनीर टिक्का, पाटवडी रस्सा, फिश करी, मसाला भात, पायसम या वैदर्भीय खाद्यपदार्थांची चव मान्यवरांना चाखायला मिळाली. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी या गाला डिनरचे नियोजन केले होते.