लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : युती किंवा महायुती म्हटले तर राजकीय पाट नजरेसमोर तरळतो. त्यामुळे, गुरू आणि शनि ग्रहांची महायुती म्हणजे काय, असा प्रश्न नक्की पडणार. हे दोन्ही ग्रह ज्योतिषशास्त्रांमध्ये अत्यंत महत्त्वाचे असल्याने, बहुधा पत्रिकेत अरिष्ट निर्दालन किंवा अरिष्ट वृद्धी तर होणार नाही, असाही सवाल अनेकांच्या डोक्यात यायला लागेल. मात्र, अशी कोणतीच शंका वा कुशंका गृहित धरू नका तर ही महायुती अत्यंत रमणीय ठरणार आहे आणि ब्रह्मांडातील हे सौंदर्य दुर्बिणीद्वारे आणखी मजेदार ठरणार आहे.
सूर्यकुळातील गुरू हा पाचवा आणि त्यानंतर शनिचा क्रमांक लागतो. या दोन्ही ग्रहांची समअंशात्मक महायुती सोमवारी २१ डिसेंबर रोजी होत आहे. जवळजवळ ४०० वर्षांनी हा योग ब्रह्मांडात जुळून येत आहे. यावेळी हे दोन्ही ग्रह आपल्याला साध्या डोळ्यांनी सहज बघता येणार आहेत.
गुरूचे सूर्यापासूनचे अंतर ७७.९० कोटी किमी तर शनिचे १४२.६७ कोटी किमी आहे. २१ डिसेंबरला सूर्यास्तानंतर संध्याकाळी ५.४४ वाजता लगेचच पश्चिम दिशेला आकाशात हे दोन ग्रह तेजस्वी ताऱ्यासम नजरेच पडतील. त्यातील जो खाली आणि जास्ती चमकणारा असेल तो गुरू असून, त्याच्यावर जो असेल तो शनि होय. हे दोन्ही ग्रह बघताना जणू ते एकच आहेत की काय, असाही भास होण्याची शक्यता आहे. ही समअंशात्मक युती असली तरी एकमेकांपासून या दोन ग्रहांचे अंतर ७३५ मिलियन किमी इतके असेल, असे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.
१६ जुलै १६२३ रोजी आले होते जवळ
यापूर्वी १६ जुलै १६२३ रोजी गुरू व शनिची महायुती झाली होती आणि पुढे असाच योग इथून ६० वर्षानंतर म्हणजेच २०८० मध्ये येणार आहे. आकाशात आपल्या अगदी डोक्यावर दिसणाऱ्या सप्तऋषी श्रृंखलेतील शेवटचे म्हणजेच सहावा वशिष्ठ आणि त्याचा जोडीदार अरुंधती या दोन ताऱ्यातील जेवढे अंतर आहे त्यापेक्षा गुरू व शनिचे अंतर कमी असणार आहे. अर्थात हे अंतर कोट्यवधी किमीचे असेल. यावेळी या दोन्ही ग्रहांचे चंद्रही दुर्बिणीद्वारे बघता येणार आहे.
२३ डिसेंबरपर्यंत असेल महायुती
गुरूचा सूर्याभोवतीचा भ्रमणकाळ ११.८६ वर्ष तर शनिचा २९.५ वर्ष असतो. १८ डिसेंबरपासून हे ग्रह एकमेकांच्या जवळ येतील तर २२ डिसेंबरपासून यांच्यातील अंतर वाढत जाईल. परंतु, २३ डिसेंबरपर्यंत ही महायुती बघता येणार आहे. प्रत्यक्षात पृथ्वीपासून गुरू ८६ कोटी किमी तर शनि १५९ कोटी किमी अंतरावर असतील.