योगेश पांडे नागपूर : हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. जे लोक रोज लोकशाहीबाबत ओरड करतात ते सभागृहात केवळ ४६ मिनिटे उपस्थित होते. यावरून त्यांचे लोकशाहीवर खरोखर किती प्रेम आहे हे लक्षात येत आहे, या शब्दांत फडणवीस यांनी ठाकरेंबाबत वक्तव्य केले. विधीमंडळ अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
हिवाळी अधिवेशनात खूप काम झाले. विरोधकांनी कामावर सुरुवातीला बहिष्कारदेखील घातला. मात्र काम पूर्ण झाले. विरोधकांनी विविध माध्यमातून आरोप केले, मात्र आम्ही त्यांना उघडे पाडले. आदित्य ठाकरे यांनी वयाचा दाखला देत काही आरोप केले. मात्र आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आम्ही राज्याच्या विकासाकडे लक्ष देत आहोत. आम्ही त्यांच्या वडिलांनाच घाबरलो नाही तर त्यांना काय घाबरू. त्यांच्या नाकाखालून ५० आमदार काढले तेव्हा मुंबईत आग लागेल असे इशारे देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात आगपेटीची काडीदेखील पेटली नाही, असे फडणवीस म्हणाले. अजित पवारांनी बावनकुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून फडणवीस यांनी चिमटा काढला. आमचे मिशन बारामती आहेच. पण मिशन महाराष्ट्रदेखील आहे. बहुतेक बावनकुळे या मिशनसाठी बारामतीला गेल्यामुळेच अजित पवार यांना राग आला असावा असे ते म्हणाले.
विरोधकांनी तारतम्य बाळगावे : मुख्यमंत्री
यंदाच्या अधिवेशनात विरोधक सभागृहापेक्षा बाहेरच जास्त बोलले. विविध मुद्दे उकरून काढत त्यांनी विविध आरोप करण्याचे प्रयत्न केले. मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही. विधानसभा अध्यक्षांनी खूप चांगले काम केले. कायद्याचे ते तज्ज्ञ आहेत. असे असतानादेखील त्यांच्यावर पातळी सोडून आरोप करण्यात आले. विरोधकांनी कमीतकमी अध्यक्षांबाबत बोलताना तरी तारतम्य बाळगावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांचा सावळागोंधळ अधिवेशनात समोर आला व गोंधळलेली स्थिती दिसून आली, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.