दयानंद पाईकराव ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेच्या एसी क्लासचे तिकीट म्हटले की ते सर्वसामान्य प्रवाशांना परडवत नाही. त्यामुळे साधारण प्रवासी स्लिपर क्लासचे आरक्षण करून प्रवास करतात. जर कुणी नागपुरातील ९९९ श्वानांनी एसी कोचमधून प्रवास केल्याचे सांगितले तर त्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण ते खरे आहे, जानेवारी ते डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपुरातील ९९९ श्वानांनी एसी कोचने प्रवास केल्याची माहिती आहे. त्यासाठी रेल्वेला तब्बल २.१६ लाखांचा महसूल मिळाला.श्वान म्हटले की या गल्लीतून त्या गल्लीत भटकंती करणारा प्राणी. परंतु काही श्वान पाळीव असल्यामुळे त्यांची खास खबरदारी घेण्यात येते. फिरायला गेले की त्याला सोबत नेणे, खाण्यासाठी महागड्या डॉगफूडची व्यवस्था करण्यात येते. परंतु खरी पंचाईत होते ती श्वान पाळलेल्या कुटुंबास बाहेरगावी जाताना. आपल्या लाडक्या ‘डॉगी’ला कुठे ठेवावे, असा प्रश्न त्यांना पडतो. मागील वर्षी शहरातील ९९९ नागरिकांनी आपल्या श्वानांना एसी डब्याचा प्रवास घडविला. यात वर्षभरात ५७२ बकऱ्यांनीही रेल्वेने प्रवास केल्याची माहिती आहे. यासाठी रेल्वेला तब्बल २ लाख १६ हजार ६७८ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
अशी आहे प्रक्रियाश्वानाला रेल्वेतून नेण्यासाठी गाडी सुटण्याच्या एका तासापूर्वी बुकिंग करावे लागते. श्वानाला फक्त एसी फर्स्ट क्लासने नेता येऊ शकते. या डब्यात वेगवेगळे ‘कुपे’ (कंपार्टमेंट) असल्यामुळे इतर प्रवाशांना त्याचा त्रास होत नाही. परंतु एखाद्या प्रवाशाकडे एसी टु टायर, एसी थ्री टायर किंवा स्लिपर क्लासचे तिकीट असेल आणि त्यास आपल्या श्वानाला सोबत न्यायचे असेल, तर त्याला गार्डच्या‘ब्रेक व्हॅन’मधील पिंजºयात ठेवावे लागते. तेथे त्या श्वानाच्या खानपानाची व्यवस्था संबंधित प्रवाशास करावी लागते.