लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयुष्याच्या वळणावर पाऊल चुकते. मात्र वेळीच ते सावरणारा देवदूत भेटला तर आयुष्याचे सोने कसे होते, याची प्रचिती सध्या भंडाऱ्यातील नवनीत नावाच्या युवकाला येत आहे. एकेकाळी घरातून बालवयात पळालेल्या या युवकाने बारमध्ये वेटरचे काम केले. मात्र श्रीकांत आगलावेसारख्या सहृदयी माणसाला दया आली. नागपुरातील प्लॅटफॉर्म शाळेची वाट दाखविली. आयुष्याला दिशा दिली. आज नवनीत हैदराबादमध्ये टाटा कनेक्ट या कंपनीत कॉम्प्युटर इंजिनियर बनला आहे.एखाद्या कथानकाला शोभावी, अशी ही कहाणी आहे. नवनीत गोपीचंद मोटघरे ऊर्फ बिट्टू असे या मुलाचे नाव. भंडारा जिल्ह्याचा रहिवासी असलेला नवनीत दहावीत असताना मोबाईल हरविला म्हणून घरातून पळून नागपुरात आला. पोटाची भूक असह्य झाल्याने एका बारमध्ये वेटर म्हणून कामाला लागला. एका सद्गृहस्थाला त्याची दया आली. त्याने बिट्टूचे मनपरिवर्तन केले. घरापासून भटकलेल्या मुलांसाठी त्या काळी लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने प्लॅटफॉर्म स्कूल नावाने शाळा सुरू करण्यात आली होती. या शाळेचे संचालन श्रीकांत आगलावे करीत होते. त्यांना नवनीतची परिस्थिती सांगितली. दुसºया दिवसापासून नवनीत बीअरबारमधील वेटरची नोकरी सोडून प्लॅटफॉर्म शाळेत दाखल झाला. येथूनच त्याच्या आयुष्याला दिशा मिळाली. त्याने पुढे शिकण्याचा मानस श्रीकांत आगलावे यांच्याकडे बोलून दाखविला. इंजिनियर बनण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले. त्याच्या स्वप्नांना श्रीकांत आगलावे यांनी बळ दिले. त्याला पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश मिळवून दिला. पण तो अपयशी ठरला. पण हार न मानता त्याने विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण केली. या गुणांच्या आधारावर आगलावे यांनी त्याला नवनीतसिंग तुली यांच्या मदतीने गुरुनानक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. प्लॅटफॉर्म शाळेत त्याला शिक्षणात काहीच कमी पडू दिले नाही. मात्र २०१६ मध्ये प्लॅटफॉर्म शाळाच बंद पडली. पुन्हा आयुष्याला संघर्षाची झळ बसली. मात्र श्रीकांत आगलावे वडिलांसारखे पाठीशी भक्कमपणे आधाराला होते. नवनीतला भारतीय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून निवास मिळवून दिला. आमदार प्रा. अनिल सोले, जयप्रकाश गुप्ता यांच्या माध्यमातून वेळोवेळी मदत मिळवून दिली. वीर बजरंग सेवा संस्थानच्या माध्यमातून शिक्षणासाठी आर्थिक सोईसवलती उपलब्ध करून दिल्या. अखेर नवनीत इंजिनियर झाला. निकालाच्या दिवशी पहिला पेढा त्याने श्रीकांत आगलावे यांच्या मुखात भरविला. अभियंता होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. एवढेच नाही तर हैदराबादमध्ये नोकरीही मिळाली. भरकटलेल्या पाखराला मोकळ्या आभाळात मार्ग गवसला. श्रीकांत आगलावे यांनी त्याच्या पंखात बळ भरले. अन् पापण्याआड पाहिलेले एक गोड स्वप्न मूर्तरुपात आले.
श्रीकांत आगलावे भेटले नसते तर...नवनीतच्या यशाबद्दल विचारले असता, तो म्हणाला की श्रीकांत आगलावे मिळाले नसते तर मी आज काय झालो असतो आणि कुठे खितपत पडलो असतो, हे सांगता येत नाही. त्यांच्यामुळे आज मी घडलोय. माझ्या हातूनही माझ्यासारखेच बिट्टू घडावे, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली.
प्लॅटफॉर्म अजूनही काम करतोयआज प्लॅटफॉर्म शाळा नाही, मात्र प्लॅटफॉर्म थांबला नाही. शाळा बंद झाली म्हणून काम संपले नाही. शाळा असती तर अनेक बिट्टू घडले असते, ते आता कसे घडतील याची खंत आहे.- श्रीकांत आगलावे, सदस्य,वीर बजरंगी सेवा संस्था