सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आईशी भांडण झाले आणि त्याने घर सोडले. नंतर त्याचा सुगावाच लागला नाही. मृत्यू झाला असावा असे कुटुंबीयांनी गृहित धरले. रेशनकार्डवर मृत म्हणूनही नोंद झाली. आठवड्यापूर्वी एका रस्ता अपघात झाला. जखमी झालेल्या एका रुग्णाला मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. अनोळखी व मनोरुग्ण म्हणून उपचार सुरू झालेत. शर्थीच्या प्रयत्नाने त्याची स्थिती सुधारली. त्याला स्वत:चे नावही सांगता आले. परंतु पत्ता सांगता येत नव्हता. त्याचा शोध घेणे सुरू झाले. अखेर यश आले. तब्बल २७ वर्षानंतर त्याची ओळख पटली. मृत भाऊ जिवंत असल्याचे कळताच त्याचे मोठे भाऊ कोल्हापूरवरून धावतच नागपुरात आले. इतक्या वर्षांनी त्याला समोर पाहताच अश्रू आवरणे कठीण झाले. दोघांना जगण्याची एक उमेद मिळाली.दुंडप्पा येलप्पा राजगोलकर (४५) रा. कोल्हापूर येथील चांदगड तालुका असे त्या रुग्णाचे नाव. आईसोबत अचानक भांडण झाल्याने दुंडप्पा यांनी घर सोडले. राग शांत झाल्यावर परत येईल, असे कुटुंबीयांना वाटले. परंतु आठवडा होऊनही दुंडप्पा परत आला नाही. शोधाशोध सुरू झाली. परंतु कुठेच सापडला नाही. १० वर्षे वाट पाहिल्यावर कुटुंबीयांनी त्याचा मृत्यू झाला असावा असे गृहित धरले. कागदोपत्री तशी नोंदही झाली. ३ आॅक्टोबर २०१९ रोजी बोरखेडी महामार्गावर अपघात झाला. जखमी अज्ञात मानसिक रुग्णाला १०८ रुग्णवाहिकेने बोरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. परंतु प्रकृती गंभीर पाहता नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. अंगावर मळकट व फाटलेले कपडे, वाढलेली दाढी, शरीरातून दुर्गंधी येत होती. त्याच्या डोक्याला व पायाला जबर मार लागला होता. या सेंटरचे प्रभारी अधिकारी प्रा. डॉ. मोहम्मद फैजल यांनी त्याची तपासणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने रुग्णाच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया केली.ट्रॉमा केअर सेंटरचे सहयोगी डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी व सामाजिक अधीक्षक यांनी त्याची शुश्रूषा केली. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेच्यादरम्यान पायात टाकण्यात आलेल्या ‘इम्प्लांट’चा खर्च समाजसेवा अधीक्षक विभागाने उचलला. काही दिवसांनी रुग्णाची प्रकृती सुधारली. परंतु मानसिक रुग्ण असल्याने काहीच सांगता येत नव्हते. सामाजिक अधीक्षक श्याम पांजला यांनी त्याला नेहमी भेटून त्याला बोलते केले. त्याने स्वत:चे नाव दुंडप्पा येलप्पा राजगोलकर सांगितले, परंतु पत्ता आठवत नव्हता. पत्त्यासाठी गुगल मॅप, भारतीय निवडणूक आयोग यांच्या संकेतस्थळाची मदत घेतली. अखेर यश आले. रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील चांदगड तालुक्यातील असल्याचे आढळून आले. नंतर नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. प्रथम त्यांना विश्वासच बसला नाही. परंतु व्हॉटस्अॅपवर फोटो व इतर माहिती पटताच त्याचे दोन्ही मोठे भाऊ व नातेवाईकांनी बुधवारी नागपूर गाठले. तब्बल २७ वर्षानंतर समोर नातेवाईकाला पाहताच दुंडप्पाला अश्रू अनावर झाले. नातेवाईकांना आभार कसे मानावे हेच कळत नव्हते.
उपचारासोबत माणुसकीचाही हात‘गोल्डन अव्हर’मध्ये अपघातातील जखमींवर उपचार करून त्यांचा जीव वाचविण्यासाठी ट्रॉमा केअर सेंटर आहे. विशेषत: अपघातानंतर येणारे बहुसंख्य रुग्ण हे सुरुवातीला अनोळखीच असतात. यामुळे रुग्णाचा जीव वाचविण्यासोबतच पत्ता शोधणे हे आव्हान ठरते. दुंडप्पा प्रकरणात डॉक्टरांपासून ते सामाजिक अधीक्षकांनी सर्वांनीच विशेष प्रयत्न केले. यामुळेच त्याला कुटुंबापर्यंत पोहचता आले. उपचारासोबतच माणुसकीचा हात आम्ही नेहमीच देत असतो.-डॉ. मो. फैजलप्रभारी अधिकारी, ट्रॉमा केअर सेंटर