लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीतील फटाक्यांच्या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयानेदेखील ताशेरे ओढल्यानंतर आता प्रदूषणविरहित दिवाळी कशी जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र लोकांना आतषबाजीचा आनंददेखील लुटता यावा व प्रदूषणदेखील होऊ नये यासाठी वैज्ञानिकांनीच पुढाकार घेतला. देशातील विविध संशोधन संस्थांनी ‘ग्रीन’ फटाक्यांची निर्मिती केली आहे. या फटाक्यांचे बुधवारी ‘नीरी’मध्ये सादरीकरणदेखील करण्यात आले.‘सीएसआयआर’अंतर्गत येणाऱ्या विविध प्रयोगशाळांमध्ये ‘ग्रीन’ फटाके निर्माण करण्यात आले आहेत. यांना ‘स्वास’ (सेफ वॉटर रिलिजर), सफल (सेफ मिनिमल अॅल्युमिनियम), ‘स्टार’ (सेफ थर्माईट क्रॅकर्स) अशी नावे देण्यात आली आहेत. या फटाक्यांचा आवाजदेखील कमी असून पर्यावरणाला लक्षात घेऊन हे फटाके बनविण्यात आले आहे. ‘सीएसआयआर’चे महासंचालक डॉ.शेखर मांडे, ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार व डॉ.शांतनू चौधरी यांच्या मार्गदर्शनात या फटाक्यांची निर्मिती झाली. ‘नीरी’त बुधवारी या ‘ग्रीन’ फटाक्यांचे सादरीकरण झाले.‘ग्रीन’ फटाक्यांमध्ये कुठलेही घातक रसायने नाहीत. तसेच फटाक्यांमधील विविध घटकांना हटवून कमी धोकादायक तत्वांचा वापर करण्यात आला आहे. फटाक्यांमधून निघणारा धूर, बारीक कण यांचे प्रमाणदेखील कमी असणार आहे. शिवाय ‘सल्फर डायआॅक्साईड’चे उत्सर्जन न करतादेखील फटाके तयार करण्याचा वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत, अशी माहिती वरिष्ठ प्रधान वैज्ञानिक डॉ.साधना रायलु यांनी दिली.
‘नीरी’त उत्सर्जनाची चाचणी होणारपहिल्यांदाच ‘नीरी’मध्ये फटाक्यांच्या माध्यमातून होणाऱ्या उत्सर्जनाची चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. येथे पारंपरिक फटाके व ‘ग्रीन’ फटाक्यांवर अभ्यास करण्यात येणार आहे. दोन्हींमधून निघणारा धूर, आवाज, रासायनिक घटक इत्यादींची तुलना करण्यात येईल. याचा उपयोग भविष्यातील संशोधनासाठी होईल.