लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे लोकांच्या जीवावर येते. परंतु एक व्यक्ती शहरातील विविध शासकीय कार्यालय परिसराची स्वच्छता करीत आहे. हे काम गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने करीत आहे. या कामात त्याला त्याची पोलीस पत्नी आणि दोन मुलही सहकार्य करतात हे विशेष. स्वच्छतेचा जणू वसाच या कुटुंबाने घेतला आहे.विनोद दहेकार असे या स्वच्छतादूताचे नाव. ते सिरसपेठ परिसरात पत्नी अर्चना व दोन मुलासोबत राहतात. २०१२ सालची ती गोष्ट.भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयातील स्वच्छता कर्मचारी सुटीवर असल्याने परिसरात बराच कचरा साचला होता. दुर्गंधी येऊ लागली होती. विनोद यांनाही त्याचा त्रास होऊ लागला. म्हणून त्यांनी झाडू उचलला आणि कचरा साफ करून परिसर स्वच्छ केला. तेव्हापासून शासकीय कार्यालय परिसराची स्वच्छता करण्याचे त्यांनी निश्चित केले. १५ आॅगस्ट २०१२ पासून त्यांनी याची सुरुवात केली. ती आजपर्यंत सलग सुरु आहे.ते दररोज सकाळी दोन तास शासकीय कार्यालय परिसराची स्वच्छता करतात. रविवारी सुटीच्या दिवशी संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत असते. भारतीय आयुर्विमा महामंडळासोबतच, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, उद्योग भवन, प्रशासकीय इमारत एक व दोन, सिंचन भवन, कोषागार कार्यालय आदी विविध शासकीय कार्यालय परिसराची ते नियमित स्वच्छता करीत असतात. साफसफाई करताना केवळ कचरा साफ करणे इतकाच तांचा उद्देश नसतो तर त्या परिसरात लोक बसू शकले पाहिजे. सोबत आणलेला डबा त्यांना तिथे बसून खाता यायला हवा, असा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्या या प्रयत्नांचे चांगले परिणामही दिसून आले आहे.
समाजासमोर आदर्श, मित्रांचीही साथविनोद यांच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवातीला अनेकांनी हसण्यावर उडवले. परंतु हळूहळू सर्वांनाच त्यांचे कौतुक वाटू लागले. पुढे पोलीस पत्नी व मुलंही त्यांच्या कामात सहकार्य करू लागले. आता त्यांच्या या कामात त्यांचे मित्रही सहकार्य करू लागले आहे. स्वच्छतेच्या मोहिमेला विनोद हे खऱ्या अर्थाने लोकअभियान बनवण्याचे कार्य करीत असून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे.