लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सहा वर्षाचे वय असताना मुलांना टीव्ही पाहणे, विविध गेम्स खेळणे आदी छंद जडतात. आईवडीलही इतक्या लहान वयात त्यांच्यावर कुठलाही दबाव टाकत नाहीत. परंतु उपराजधानीतील वरद भूषण मालखंडाळे याला अपवाद ठरला आहे. त्याने नागपुरातील चिटणवीस सेंटरमध्ये रविवारी तीन विक्रम करून नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. वरदने पहिल्या विक्रमासाठी भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची आरटीओ नावांची मालिका केवळ ४४ सेकंदात ओळखली. दुसऱ्या विक्रमासाठी त्याने महाराष्ट्रातील सर्व आरटीओ क्रमांकाची मालिका (एम. एच. ०१ ते एम. एच. ५१) केवळ ५० सेकंदात ओळखली अन् तिसऱ्या विक्रमासाठी महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्हे नकाशावर केवळ ४२ सेकंदात अचूक ओळखून नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. वरदने अवघ्या काही सेकंदात केलेले हे विक्रम पाहून चिटणवीस सेंटरमध्ये उपस्थित सर्वजण आश्चर्यचकित झाले.वरदचा जन्म २३ मार्च २०१२ रोजी झाला असून तो नारायणा विद्यालयम नागपूर येथून केजी-२ उत्तीर्ण झाला आहे. त्याचे वडील भूषण मालखंडाळे हे सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता पदावर कार्यरत असून आई उज्ज्वला मालखंडाळे प्रियदर्शिनी इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. चिटणीस सेंटरमध्ये आज झालेल्या रेकॉर्डमध्ये वरदने सुरुवातीला आरटीओ सिरीज आणि जिल्हे ही अनुक्रमाने व त्यानंतर रॅन्डम क्रमाने ओळखून आपल्या कुशाग्र बुद्धीचा परिचय दिला. वरदने भारतातील सर्वात प्रतिष्ठित अशा दोन रेकॉर्ड संस्था, इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस आणि वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया या दोन्हीसाठी रेकॉर्डस साध्य केले आहेत. आयबीआरतर्फे प्राथमिक परंतु सखोल तपासणीनंतर वरदला या तीन विक्रमासाठी प्रयत्न करण्याची परवानगी देण्यात आली. यापूर्वीही वरदच्या नावावर सहा राष्ट्रीय विक्रमांची नोंद आहे. त्याने तीन वर्षांचा असताना पहिला विक्रम केला होता. या विक्रमांच्या दाव्याचे प्रत्यक्ष मूल्यमापन व निवाडा करण्यासाठी डॉ. सुनीता धोटे सहायक प्राध्यापिका व्यवस्थापन तंत्रशास्त्र विभाग, रामदेवबाबा अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय यांना आयबीआरतर्फे परीक्षक म्हणून नेमण्यात आले होते. त्या स्वत: आशिया बुक रेकॉर्ड धारक आहेत. वरदला कारच्या विविध मॉडेल्स व प्रवासाची आवड आहे. विविध गावांची वैशिष्ट्ये व अंतराचे त्याला कुतूहल आहे. त्यातूनच त्याने कारच्या मॉडेल्सचे व भारताची राज्य ओळखणे हे विक्रम केले.या विक्रमानंतर वाहनांची नंबर प्लेट व महाराष्ट्रातील विविध गावांकडे वरदचे लक्ष वेधले गेले. इतक्या कमी वयात त्याने या विक्रमांची नोंद केल्याबद्दल सर्वांनी त्याचे भरभरून कौतुक केले. सकाळी १० वाजता विक्रमाला सुरुवात झाली. वरदने विक्रम प्रस्थापित केल्यानंतर इंडिया बुक आॅफ रेकॉर्डच्या डॉ. सुनीता धोटे यांनी त्यास मेडल्स आणि ट्रॉफी प्रदान केली.
वरदचे यापूर्वीचे विक्रम९६ कारचे मॉडेल एका मिनिटात ओळखणे, २२ कंपन्यांचे १०७ कार मॉडेल्स एक मिनिट नऊ सेकंदात ओळखणेउलट एबीसीडी केवळ ३.३९ सेकंदात पूर्ण करणे५१ शब्दांचे स्पेलिंग एका मिनिटात व एकूण १६० शब्दांचे स्पेलिंग पाच मिनिटात सांगणे१०० ते ० उलट मोजणी ७० सेकंदातभारताची सर्व ३० राज्ये ३९ सेकंदात ओळखणेभारताच्या सर्व ३० राज्यांचे लहान नकाशे जोडून भारताचा नकाशा २ मिनिटे व १२ सेकंदात तयार करणे