सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांना औषधे व यंत्रसामुग्री पुरवठा करण्याची जबाबदारी देण्यात आलेल्या हाफकिन महामंडळाला दीड वर्षांचा काळ उलटूनही पुरवठा सुरळीत झालेला नाही. सध्या मेडिकलमध्ये दीड ते दोन महिना पुरेल एवढाच औषधांचा साठा आहे. धक्कादायक म्हणजे, मेडिकल प्रशासनाला चंद्रपूर व गोंदिया येथून उसनवारीवर औषधे घेण्याची वेळ आली आहे. सूत्रानूसार, रुग्णालयात सध्या ४० ते ५० टक्केच औषधांचा साठा उपलब्ध आहेत.औषध व वैद्यकीय उपकरणांचे दर आणि मानके यामध्ये एकसूत्रता आणण्यासाठी व दर्जा व गुणवत्ता सुधारण्यास मदत होण्यासाठी औषध व यंत्रसामुग्री खरेदीचे केंद्रीकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने जुलै २०१७ रोजी घेतला. राज्यातील प्रत्येक मेडिकलला औषध व साहित्य खरेदीचा त्यांचा निधी ‘हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स कॉपोर्रेशन लिमिटेड’कडे वळता करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) औषधांसाठी पाच कोटी रुपये हाफकिनकडे वळते केले. परंतु जानेवारी ते आतापर्यंत केवळ तीनवेळा औषधांचा पुरवठा झाला. यामुळे रुग्णालय प्रशासनाला मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करण्याची वेळ आली आहे शिवाय, इतर मेडिकलमधून उसनवारीने औषधे घ्यावी लागत आहे.
औषध पुरवठ्यात मेडिकलसोबत भेदभाव!आशिया खंडातील सर्वात मोठ्या दुसऱ्या क्रमांकाचे रुग्णालय म्हणून नागपूर मेडिकलची ओळख आहे. केवळ विदर्भच नाही तर मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड येथून रुग्ण येतात. अडीच हजारावर खाटा असलेल्या या रुग्णालयासोबत हाफकिन कंपनी औषधांचा पुरवठा करण्याबाबत भेदभाव करीत असल्याचेही समोर आले आहे. मेडिकलला कमी व नुकतेच सुरू झालेल्या गोंदिया व चंद्रपूर मेडिकलला औषधांचा आवश्यकपेक्षा जास्त पुरवठा केला जात आहे. परिणामी, मेडिकल प्रशासनाला या दोन्ही रुग्णालयातून उसनवारी तत्त्वावर औषधे मागण्याची वेळ आली आहे. गेल्या दोन दिवसात या रुग्णालयातून दोन ट्रक औषधे मेडिकलला प्राप्त झाली आहेत.
औषध खरेदीची मर्यादाही ओलांडलीऔषधांच्या तुटवड्याने मेडिकल प्रशासनाला मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवर औषधे खरेदी करावी लागत आहे. सूत्रानूसार, शस्त्रक्रियेच्यावेळी रुग्णांना भूल देण्यासाठी वापरण्यात येणारे ‘सेवोफ्लूरेन’ या इंजेक्शनचा तुटवडा पडला आहे. मेडिकलमध्ये रोज ५० वर शस्त्रक्रिया होतात. यातील मोठ्या शस्त्रक्रियांना या इंजेक्शनचा दोन ते तीन बॉटल्स लागतात. दिवसाकाठी ८० वर बॉटल्सची गरज पडते. स्थानिक पातळीवर या इंजेक्शनची खरेदीची मर्यादाही ओलांडण्यात आली आहे. गोंदिया, चंद्रपूर येथून मागविण्यात आलेल्या औषधांमध्ये या इंजेक्शनचाही समावेश आहे.
गरज १० कोटींची मिळतात पाच कोटीमेडिकलमध्ये वाढते विभाग, वाढते रुग्ण व खाटांची संख्या विचारात घेतल्यास मेडिकलला दरवर्षी १० ते १२ कोटींची औषधे लागतात. परंतु शासनाकडून औषधांसाठी केवळ पाचच कोटी दिले जातात. परिणामी, औषधांचा तुटवडा निर्माण होऊन याचा फटका सामान्यांना बसत आहे. गरीब रुग्णांवर पदरमोड करून औषधे विकत घेण्याची वेळ आली आहे