- राकेश घानोडेनागपूर - कॉमनवेल्थ मॅजिस्ट्रेट्स ॲण्ड जजेस असोसिएशनची यंदाची वार्षिक परिषद १० ते १४ सप्टेंबरपर्यंत वेल्स (यूके) येथे आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळ सहभागी होणार असून सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती भूषण गवई मंडळाचे नेतृत्व करतील.
ही पाच दिवसीय परिषद 'ओपन जस्टीस टुडे' या थीमवर आधारीत आहे. परिषदेंतर्गत मुख्य न्यायमूर्ती व कौन्सिलची बैठक होणार आहे. न्या. गवई त्या बैठकांना उपस्थित राहतील व विविध महत्वपूर्ण मुद्यांवर मार्गदर्शन करतील. याशिवाय परिषदेमध्ये फौजदारी व दिवाणी आदेशांद्वारे महिला व बाल संरक्षण, नवीन सायबर गुन्हे व जुने कायदे, न्यायालय वार्तांकनातील पारदर्शकता, मानवाधिकार, बहुभाषिक क्षेत्रात न्याय पोहोचविणे इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर मंथन होणार आहे. या संघटनेने कॉमनवेल्थ देशांमधील सर्वांत कनिष्ठ न्यायाधीशांपासून ते सर्वोच्च न्यायाधीशांपर्यंत सर्वांना एकत्र आणले आहे. न्यायव्यवस्थेला काळानुरूप आधुनिक करणे, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणे, कॉमनवेल्थ देशांमधील गुन्हेगारी कमी करणे, कायद्याच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, कायद्याशी संबंधित माहितीचे आदानप्रदान करणे इत्यादी उद्देशांची पूर्तता करण्यासाठी ही संघटना कार्य करते. त्याअंतर्गत २०१२ पासून ही परिषद आयोजित केली जात आहे.