नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे यांची नागपुरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कुलपती पदावर नियुक्ती करण्यात आल्यामुळे विधी क्षेत्रातील मान्यवरांनी आनंद व्यक्त केला आहे. ही नियुक्ती नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ठरली आहे. न्यायमूर्ती बोबडे यांचा जन्म २४ एप्रिल १९५६ रोजी नागपुरात झाला. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयातून १९७८ मध्ये कायद्याची पदवी पूर्ण केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकील म्हणून कार्यरत असताना, १९९८ मध्ये ते वरिष्ठ वकील झाले. मार्च- २००० मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असताना त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती बोबडे यांचा कार्यकाळ नागपूरकरांसाठी नेहमीच अभिमानास्पद राहिला आहे. त्यांची आता महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कुलपती पदावर नियुक्ती झाल्यामुळे नागपूरकरांची छाती पुन्हा एकदा अभिमानाने फुलली आहे. कुलपती पदावर नियुक्ती जाहीर झाल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून कामकाजाचा आढावा घेतला. तसेच, अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिलेत.(प्रतिनिधी)विद्यापीठाला चांगले भवितव्यन्यायमूर्ती शरद बोबडे हे कुलपती झाल्यामुळे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला चांगले भवितव्य आहे. हे विद्यापीठ देशात नाव कमावेल. न्यायमूर्ती बोबडे हे मनमिळावू व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांची कुलपती पदावर नियुक्ती होणे आपले भाग्य आहे.- अॅड. किशोर लांबट, सर्वोच्च न्यायालय.अभिमानाची बाब आहेन्यायमूर्ती शरद बोबडे यांची नागपुरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या कुलपती पदावर नियुक्ती होणे नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. या विद्यापीठाला न्यायमूर्ती बोबडे हेच मोठे करू शकतात. त्यांना शैक्षणिक क्षेत्रात रुची आहे. - अॅड. अनिल किलोर, हायकोर्ट, नागपूर.
न्या. बोबडे यांची कुलपती पदावर नियुक्ती झाल्याने शहरात आनंद
By admin | Published: February 02, 2016 2:46 AM