नागपूर : न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणात सरकारचा प्रचंड दबाव आहे. दिल्लीतील आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्या फॉरेन्सिक मेडिसिन आणि विष विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आर के. शर्मा यांच्या मते, लोया यांचा मृत्यू हृदयविकाराने झालेला नाही, अशा आशयाचा अहवाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयसुद्धा या प्रकरणाला पाहिजे तसा न्याय देताना दिसत नाही. त्यामुळे प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावे, अशी मागणी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. प्रशांत भूषण यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी संवाद साधताना केली.न्या. लोया यांचा मृत्यू हृदयविकाराने झालेला नाही. सुरुवातीला लोया यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली होती. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात मार्चच्या पहिल्या आठवड्यात मध्यस्थी याचिका दाखल करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.राफेल लढाऊ विमान खरेदीत २२ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. गेल्या ३० वर्षांतील हा सर्वात मोठा घोटाळा आहे. बोफोर्स घोटाळा या तुलनेत काहीच नाही. बॅँकांनी ५०० कोटींहून अधिक कर्ज दिलेल्यांची यादी जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
न्या. लोयांचा मृत्यू हृदयविकाराने नाही - प्रशांत भूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 4:28 AM