प्रस्ताव पारित : मुख्य न्यायमूर्तींना करण्यात येईल विनंती नागपूर : न्यायमूर्ती भूषण गवई यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून अन्यत्र स्थानांतरित करण्यात येऊ नये अशी विनंती मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्लुर यांना करण्यासाठी हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरच्या सर्वसाधारण सभेमध्ये बुधवारी एकमताने प्रस्ताव पारित करण्यात आला. या प्रस्तावानुसार, मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्लुर यांना संघटनेच्या वतीने निवेदन सादर करून न्यायमूर्ती भूषण गवई यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून अन्यत्र स्थानांतरित करण्यात येऊ नये अशी विनंती करण्यात येणार आहे. न्या. गवई नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती आहेत. ते नागपूर खंडपीठातच कायम राहावेत अशी वकिलांची इच्छा आहे. त्याकरिता मुख्य न्यायमूर्तींना विनंती करणे आवश्यक आहे. परिणामी अॅड. श्रीरंग भांडारकर, अॅड. आर. सी. माडखोलकर, अॅड. जे. एस. मोकादम, अॅड. आर. एस. नायक, अॅड. अंजली भांडारकर, अॅड. आर. एम. पांडे, अॅड. मंगेश बुटे, अॅड. रजनीश व्यास यांच्यासह अनेक वकिलांनी हायकोर्ट बार असोसिएशनला निवेदन देऊन मुख्य न्यायमूर्तींना विनंतीपत्र सादर करण्याच्या मुद्यावर निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी संघटनेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती.(प्रतिनिधी) न्यायमूर्ती भूषण गवई मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातच कायम राहावे ही वकिलांची मागणी योग्य आहे. त्यामुळे संघटनेची सर्वसाधारण सभा आयोजित करून त्यात या मागणीचा प्रस्ताव एकमताने पारित करण्यात आला. - अॅड. अनिल किलोर, अध्यक्ष, हायकोर्ट बार असोसिएशन नागपूर.
न्या. भूषण गवई यांना स्थानांतरित करू नका
By admin | Published: May 04, 2017 2:12 AM