लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांचा मृत्यू रेडिओअॅक्टिव्ह आयसोटोप विषामुळे झाला, असा खळबळजनक दावा अॅड. सतीश उके यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे.२०९ पानांच्या या याचिकेमध्ये उके यांनी त्यांच्या स्वत:च्या जीवाला दोषी व्यक्तींकडून धोका असल्याचा आरोप केला आहे. संशयास्पद मृत्यू झालेले अॅड. श्रीकांत खंडाळकर व सत्र न्यायाधीश प्रकाश ठोंबरे यांनी उके यांना लोया यांचा मृत्यू रेडिओअॅक्टिव्ह आयसोटोप विषामुळे झाल्याची माहिती दिली होती, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.मार्च-२०१५ मध्ये भाजपाच्या एका बड्या नेत्याने अॅटोमिक एनर्जी कमिशनच्या तत्कालीन अध्यक्षाची भेट घेतली होती. त्या बैठकीचा सर्व रेकॉर्ड नष्ट करण्यात आला आहे. लोया यांना रेडिओअॅक्टिव्ह आयसोटोप विष देण्याचा निर्णय त्या बैठकीमध्ये झाला होता, असे संकेत यातून मिळत आहेत. त्या काळात लोया यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवर बोललो होतो. दरम्यान, त्यांनी सोहराबुद्दीन प्रकरणामुळे धमक्या मिळत असल्याचे सांगितले होते. लोया यांनी सोहराबुद्दीन प्रकरणातील मसुदा निर्णयाची खंडाळकर यांना माहिती दिली होती. त्यानंतर खंडाळकर यांचा संशयास्पद मृत्यू झाला. तसेच, ठोंबरे यांचा मे-२०१६ मध्ये नागपूर ते बंगळुरू रेल्वे प्रवासादरम्यान संशयास्पद मृत्यू झाला. ८ जून २०१६ रोजी लोखंडाचे पाईप व अन्य जड वस्तू आपल्या कार्यालयावर फेकण्यात आल्या होत्या. त्यातून आपण सुदैवाने बचावलो, असे उके यांनी याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणातील सर्व महत्त्वाची कागदपत्रे न्यायालयाने स्वत:च्या ताब्यात सुरक्षित ठेवून घ्यावीत, अशी विनंती उके यांनी याचिकेत केली आहे.
न्या. लोया यांचा मृत्यू रेडिओअॅक्टिव्ह आयसोटोप विषामुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:31 AM
सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया यांचा मृत्यू रेडिओअॅक्टिव्ह आयसोटोप विषामुळे झाला, असा खळबळजनक दावा अॅड. सतीश उके यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे.
ठळक मुद्देअॅड. सतीश उके यांचा दावा : हायकोर्टात दाखल केली नवीन याचिका