लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ओडिशा उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती वल्लभदास एडन मोहता यांचे मंगळवारी सायंकाळी रामदासपेठ येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ११ वाजता अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.२६ एप्रिल १९३३ रोजी अकोला येथे जन्मलेले मोहता यांनी नागपुरातील विधी महाविद्यालयातून एलएल. बी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी अकोला व नागपूर येथे वकिली व्यवसाय केला. २७ एप्रिल १९७९ रोजी त्यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. १५ आॅक्टोबर १९८२ रोजी ते न्यायमूर्तीपदी कायम झाले. १९९४ मध्ये त्यांना ओडिशा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्त करण्यात आले. २६ एप्रिल १९९५ रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ अधिवक्ता म्हणून वकिली केली. ते विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी जुळलेले होते. त्यांच्या पश्चात मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती अनुप मोहता, डॉ. नरेंद्र मोहता व संजय मोहता ही तीन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे.