न्यायमूर्ती लोणार सरोवराला भेट देऊन समस्या समजून घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 10:46 PM2020-01-08T22:46:48+5:302020-01-08T22:48:26+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व मिलिंद जाधव हे १ फेब्रुवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील समस्या जाणून घेणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व मिलिंद जाधव हे १ फेब्रुवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील समस्या जाणून घेणार आहेत. त्याकरिता समस्यांचे संक्षिप्त टिपण सादर करण्याचा आदेश बुधवारी न्यायालय मित्र अॅड़ आनंद परचुरे व सरकारी वकील अॅड. दीपक ठाकरे यांना देण्यात आला.
यासंदर्भात अॅड़ कीर्ती निपाणकर (नागपूर), गोविंद खेकाळे व सुधाकर बुगदाने (दोन्ही बुलडाणा) यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. गेल्या तारखेला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने लोणार सरोवर विकास आराखड्याचे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केले होते. त्यानुसार, हा ९१.२९ कोटीचा विकास आराखडा असून, आतापर्यंत महामंडळाला ९ कोटी रुपये मिळाले आहेत. त्यातील ८.२० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सरकारने आणखी ५.३० कोटी रुपये मंजूर केले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार, लोणार सरोवराच्या संवर्धनाकरिता विशेष समितीही स्थापन करण्यात आली असून, त्यात बुलडाणा जिल्हाधिकारी, जिल्हा वनाधिकारी, औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रतिनिधी, मेहकर येथील उपविभागीय अधिकारी, लोणार येथील तहसीलदार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, याचिकाकर्ते सुधाकर बुगदाने आदींचा समावेश आहे.