लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील चार वर्षात नागपूर शहरात रेल्वे सुरक्षा दलाचा वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त म्हणून काम करताना अनेक चांगले अनुभव आले. नागपुरातील नागरिक प्रेमळ आहेत. आरपीएफचा प्रमुख म्हणून अनेक चांगली कामे केली. अनेक उपक्रम राबवून आरपीएफची प्रतिमा उंचावण्यात यशस्वी झालो, असे प्रतिपादन ज्योती कुमार सतीजा यांनी केले.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांची पदोन्नतीवर लखनौच्या आरपीएफ ट्रेनिंग अॅकेडमीच्या उपमहानिरीक्षक पदावर बदली झाली. यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. सतीजा म्हणाले, मागील चार वर्षात रेल्वेत अनेक चांगली कामे केली. आरपीएफ जवानांचे समुपदेशन करून त्यांचा उत्साह वाढविला. चार वर्षात ३२३१ चांगली कामे केली. घरून पळालेल्या १०७२ मुलांना सुखरुप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. गांजाच्या ५२ केसमध्ये ३५ जणांना अटक करून १.४ कोटीचा गांजा जप्त केला. दारूच्या ८५४ केसेसमध्ये ३११ तस्करांना अटक करून १.१५ कोटी रुपयांची दारु जप्त केली. मोबाईल आणि प्रवाशांचे सामान पळविण्याच्या १७६ प्रकरणात २१२ जणांना अटक करून २५.८४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या ९० दलालांचा बंदोबस्त करून १.१३ कोटींच्या तिकीट जप्त केली. सोन्याचांदीचे दागिने विना कागदपत्र नेणाऱ्या ७ जणांकडून ३.११ कोटींचे दागिने जप्त केले. गुटखा तस्करीच्या २४ केसेस पकडल्या. मोबाईल हरविलेल्या २६४ जणांना त्यांचे मोबाईल परत केले. १६ हजार १६० अवैध व्हेंडरविरुद्ध कारवाई करून ३४७ जणांना तुरुंगात पाठविले. रेल्वेस्थानकावरील सर्व अवैध प्रवेशद्वारे बंद केल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागला. वर्धा, आमला आणि घोडाडोंगरी ठाणे तंबाखूमुक्त केल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला दपूम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्येय, सहायक सुरक्षा आयुक्त दीपकसिंग चौहान उपस्थित होते.सामाजिक कामातही आरपीएफ अग्रेसररेल्वे सुरक्षा दलाने मागील चार वर्षात १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्तदानाप्रति जनजागृती केली. आरपीएफच्या ५० जवानांनी अवयवदानाचा संकल्प केला. नो हॉर्न हा उपक्रम शहरात राबविला. मागील चार वर्षांपासून दर शनिवारी १०० कॅन्सरच्या रुग्णांना जेवण देण्यात येत असल्याचे सतीजा यांनी सांगितले.