लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कडकनाथ कोंबडी पालनाच्या व्यवसायातून अल्पावधीत लाखोंचा फायदा मिळतो, अशी थाप मारून आपल्या कंपनीत रक्कम गुंतविण्यास भाग पडणाऱ्या सांगली जिल्ह्यातील दोन ठगबाजांनी नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ कोटी, ६० लाख रुपयांचा गंडा घातला.गेल्या अनेक दिवसापासून आरोपींकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पीडित शेतकऱ्यांना फसविण्यात आल्याचे लक्षात आले. त्यामुळे बजाजनगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार नोंदविली. सुधीर शंकर मोहिते (वय ३०, रा. वडेगाव, कडेगाव, जी. सांगली) आणि संदीप सुभाष मोहिते (वय ३०, रा. इस्लामपूर, जि. सांगली) अशी आरोपींची नावे आहेत. वर्षभरापूर्वी आरोपी नागपुरात आले होते त्यांनी महा रयत अॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तसेच रयत अॅग्रो इंडिया लिमिटेड या दोन कंपनी आपल्या मालकीच्या असून कंपनीमार्फत शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन आणि आर्थिक फायद्याच्या वेगवेगळ्या योजना समजावून सांगितल्या होत्या. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर या दोन ठगबाजानी आपल्या कंपनीतील अधिकाऱ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबडीपालन व्यवसायाचे स्वरूप समजावून सांगितले. यातून अल्पावधीत मोठा आर्थिक फायदा मिळतो, असे सांगून त्यांनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून वेगवेगळी रक्कम जमा केली. मूळचे न्यू कॉलनी, फेज नंबर दोन, नवी दिल्ली येथील रहिवासी असलेले आणि सध्या कळमेश्वर तालुक्यातील सेलू गुमथळा गावात राहणारे विकास बळवंत मेश्राम यांनाही हेच आमिष दाखवले होते. त्यामुळे मेश्राम आणि अन्य ११० शेतकऱ्यांनी आरोपींकडे ३ एप्रिल २०१९ पासून १ सप्टेंबर २०१९ पर्यंत वेगवेगळी रक्कम दिली. मेश्रामसह १११ शेतकऱ्यांकडून एकूण १ कोटी, ६० लाख, ५६० रुपये गोळा करून आरोपींनी गाशा गुंडाळला. त्यांनी केलेल्या करारानुसार कोणत्याही प्रकारचा लाभ पैसे गुंतविणाऱ्या शेतकऱ्यांना मिळाला नाही. कराराचे पालनही झाले नाही. अलीकडे सुधीर मोहिते आणि संदीप मोहिते पैसे देणे दूर, शेतकऱ्यांना प्रतिसादच देत नव्हते. त्यामुळे त्यांनी फसवणूक केल्याचे सर्वांच्या लक्षात आले. त्यामुळे सर्वांच्यावतीने मेश्राम यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात काही दिवसापूर्वी तक्रार अर्ज दिला. त्याची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर सुधीर मोहिते आणि संदीप मोहिते या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपींची अनेक ठिकाणी ठगबाजीआरोपींनी अशा प्रकारे अनेक ठिकाणी ठगबाजी करून शेतकऱ्यांना गंडविले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. शुक्रवारी बजाजनगर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली. आरोपींचा शोध घेतला जात आहे.