लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्येष्ठ चरित्र अभिनेता व उत्कृष्ट संवादलेखक कादर खान यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. नागपूरच्या नाट्य व सिनेरसिकांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. कादर खान यांच्या नाटकांचे प्रयोग नागपूरला झाले होते. याशिवाय काही संगीत कार्यक्रमा निमित्त त्यांनी सहभाग घेतला होता. पण एवढ्या मोठ्या उंचीचा हा कलावंत कुठलाही आव न बाळगता सर्वसाधारण माणसांप्रमाणे बोलला, वावरला व राहिलाही. त्यांच्या दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचे पैलू नागपूरकर कलावंत आणि व्यक्तींनी उलगडले.२००२ साली कादर खान यांचेच लेखन असलेल्या ‘ताश के पत्ते’ या नाटकाचे प्रयोग नागपूरला झाले होते. त्यातील एक प्रयोग चंद्रपूरला व दोन शहरातील वसंतराव देशपांडे सभागृहात झाले. या नाटकाचे आयोजन वर्तमानात विठोबा दंत मंजनचे एमडी कार्तिक शेंडे यांच्या पुढाकाराने झाले होते. कार्तिक शेंडे यांनी सांगितले, प्रयोगाच्या दिवशी त्यांच्या टीमचे शहरात आगमन झाले होते. त्यांचा मुलगा सरफराजही त्यांच्यासोबत होता. त्यावेळी विमानतळावर त्यांचे स्वागत करायला गेलो तेव्हा ते भारावले होते. पहिला प्रयोग चंद्रपूरला झाला व पुढचे दोन नागपूरला. दोन दिवस ते शहरात होते, पण कुठलाही मोठेपणाचा आव त्यांच्या वागण्यात जाणवला नाही. सर्वसाधारण माणसांप्रमाणे ते लोकांशी भेटायचे, बोलायचे. सर्वांशी मिळून राहायचे. ज्येष्ठांच्या समस्या मांडणाऱ्या या कौटुंबिक नाटकात त्यांनी व त्यांच्या टीमने समरसून अभिनय केला. त्यावेळी तीन तास सलग चालणारे हे नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्यांची शैली विनोदी असली तरी कोणत्याही विषयावर त्यांचे भाष्य धीरगंभीर स्वरूपाचे असायचे. त्यांनी आवड व्यक्त केल्याने त्यांच्यासाठी स्वत: मोमीनपुऱ्याहून बिर्याणी आणून दिल्याची आठवणही शेंडे यांनी यावेळी उलगडली. त्यांचा एक मित्र टेलिफोन एक्स्चेंज चौकात राहत होता. अगदी आग्रह करून त्यांच्या भेटीला जाण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. टिंबरचा व्यवसाय करणाऱ्या या मित्राला भेटायला गेल्याची आठवण कार्तिक शेंडे यांनी आवर्जून सांगितली. मित्रांना, माणसांना जपणारे हे माणूसपण त्यांच्यामध्ये जाणवल्याचे शेंडे यांनी सांगितले.यहां से संत्रे लेकर जाऊंगाप्रसिद्ध गायक कादर भाई यांनीही कादर खान यांच्या आठवणींना उजाळा दिला. १२-१३ वर्षांपूर्वी एका पुस्तकाच्या विमोचनासाठी कादर खान नागपूरला आले होते. त्यावेळी आम्ही केडीके कॉलेजजवळ गझलांचा कार्यक्रम आयोजित केला होता. या गझल कार्यक्रमाचा आनंद त्यांनी घेतला. यावेळी ‘संत्रो का शहर इस नाम से नागपूर की पहेचान है, मुंबई जाते हुये संत्रे लेकर जाऊंगा’, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. मोठा कलावंत व डॉयलॉग लेखक असलेला हा माणूस अतिशय मिलनसार असल्याची भावना कादर भाई यांनी व्यक्त केली.त्यांनी ऐकविले होते डॉयलॉगआर्केस्ट्रा संचालक ओ.पी. सिंग यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. १९८६-८७ या वर्षात आयोजित एका संगीतमय कार्यक्रमात कादर खान यांनी सहभाग घेतला होता. यावेळी चित्रपटातील अनेक डॉयलॉग त्यांनी प्रेक्षकांना ऐकविले. ते दिलखुलास व्यक्ती होते व लोकांना हसवत राहायचे. त्यांच्यासोबत ऑस्ट्रेलियामध्येही कार्यक्रम घेतल्याचे सिंग यांनी सांगितले. त्यांच्याकडे एक व्हॅन होती, ज्यात बसून ते चित्रीकरणाच्या एका स्थळावरून दुसºया ठिकाणी जायचे. या व्हॅनमध्ये बसूनच ते तीन-चार चित्रपटांचे संवाद लेखन करायचे. एवढ्या मोठ्या प्रतिभेचा हा माणूस, सामान्य माणसांप्रमाणे जगल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.एक विलक्षण मार्गदर्शकशहरातील तरुण कलावंत मोहम्मद सलीम यांनी कादर खान यांच्या भेटीची आठवण मांडली. कादर खान यांची मुंबईमध्ये अभिनय प्रशिक्षणाची संस्था आहे. त्यांच्याकडे जाण्याची संधी २००६ मध्ये मिळाली होती. ते जॉली नेचरचे व्यक्ती होते पण मर्गदर्शन करताना ते गंभीर व्हायचे. त्या काही दिवसात संवाद कसे उच्चारायचे, त्यांना अभिनयात कसे मांडायचे, अभिनय करताना अरबी व उर्दु भाषा शिकणे महत्त्वाचे का आहे, याचे मार्गदर्शन त्यांनी केले. अभिनेता व संवाद लेखक म्हणून त्यांच्याकडे अद्भूत प्रतिभा असल्याची भावना सलीम यांनी व्यक्त केली.