कामठी : राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या आर. आर. आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत कामठी तालुक्यातील कढोली गावाने जिल्ह्यात पहिले स्थान पटकाविले आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात या स्पर्धेच्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जि.प. अध्यक्षा रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभजेकर यांच्या हस्ते कढोलीच्या सरपंच प्रांजल वाघ यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारासाठी कढोली ग्रा.पं.ला ५० लाख रुपये शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहे. जिल्हा आणि कामठी तालुकास्तरावर ‘स्मार्ट ग्राम योजने’त सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल कढोलीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी प्रशासनाने आखून दिलेल्या निकषाच्या आधारावर कढोली गावाने स्मार्ट ग्राम योजनेत सहभाग घेतला होता. यामध्ये शौचालयाचा वापर, वृक्षलागवड, पाणीव्यवस्थापन, ग्रामपंचायतचे सुशोभिकरण, परसबाग, रोपवाटिका, स्वच्छ सुंदर शाळा, सौर पथदिवे, इमारत रंगरंगोटी, रस्ते-नाली सफाई, गावस्वच्छतेसाठी विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत. जिल्हास्तरीय समितीच्या पाहणीनंतर हा पुरस्कार प्रदान केला जातो. पुरस्कार सोहळ्याला कढोली ग्रा.पं.चे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कढोलीने वाढविला जिल्ह्याचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 4:12 AM