अनिल देशमुख यांची घोषणा : काँग्रेसवर वेळकाढू धोरणाचा ठपका नागपूर : राष्ट्रवादीने आघाडी करण्याबाबत दिलेल्या प्रस्तावाला काँग्रेसने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यामुळे अखेर आघाडी तुटली आहे. प्रस्ताव देणाऱ्या राष्ट्रवादीनेच आघाडी तुटल्याची घोषणा करण्यातही पुढाकार घेतला आहे. नागपुरात भाजपसारख्या बलाढ्य पक्षाशी सामना असल्यामुळे तसेच चार सदस्यीय प्रभाग आघाडी तुटल्यामुळे आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांपुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंगळवारी दिवसभर काँग्रेसच्या नेत्यांशी संपर्क साधून आघाडीची बोलणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसचे सर्वच नेते मुंबईत संसदीय मंडळाच्या बैठकीसाठी गेले आहेत. त्यामुळे फक्त मोबाईलवर चर्चेच्या फेऱ्या होत राहिल्या. शेवटी तोडगा निघत नसल्यामुळे मंगळवारी रात्री ८.३० वाजता राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करीत आघाडी तुटल्याची व राष्ट्रवादी आता स्वबळावरच लढेल, अशी घोषणा केली. देशमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, जातीवादी शक्तीला थांबविण्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याचा आमचा प्रयत्न होता. यासाठी काँग्रेसकडे प्रस्ताव देण्यात आला होता. काँग्रेस नेत्यांसोबत बैठका घेऊन चर्चाही करण्यात आली. मात्र,राष्ट्रवादीसाठी पोषक वातावरण असलेल्या जागाही सोडण्यास काँग्रेस तयार नव्हती. काँग्रेसने अखेरपर्यंत वेळकाढू धोरण सुरू ठेवले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ निघत आहे. काँग्रेस पाहू-थांबा असे सांगत आहे. यामुळे राष्ट्रवादी इतर समविचारी पक्षाला सोबत घेऊन स्वबळावर निवडणुकीला सामोरे जात आहे, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची २९ जागांवर आघाडी झाली होती. याशिवाय दोन्ही पक्षांनी आघाडी धर्म न पाळता आपल्या उमेदवारांना ए-बी फॉर्म दिल्याने तीन जागांवर मैत्रीपूर्ण लढत झाली होती. निकालानंतर राष्ट्रवादीने ६ तर काँग्रेसने ४१ जागा जिंकल्या होत्या. (प्रतिनिधी)
काँग्रेस-राष्ट्रवादीत काडीमोड
By admin | Published: February 01, 2017 2:17 AM