आॅनलाईन लोकमतनागपूर : माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी ‘व्हिजन २०२०’ अंतर्गत मांडण्यात आलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी देशभरात २००० विशेष केंद्र उघडण्यात येणार आहे. यातील २०० केंद्र सुरू झाले असून नागपुरातदेखील ‘कलाम’ केंद्र उघडण्यात येणार आहे. या माध्यमातून सकारात्मक व विधायक कार्य होत असल्याची माहिती डॉ.कलाम यांचे माजी सल्लागार सृजन पाल सिंह यांनी दिली. डॉ. सृजन पाल सिंह सोमवारी नागपुरात आले होते, त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.१९९९ मध्ये डॉ.कलाम यांनी ‘व्हिजन २०२०’ची संकल्पना मांडली होती. या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी देशाचे नागरिक व प्रामुख्याने तरुणांनी सक्रिय भूमिका पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले होते. डॉ. कलाम यांच्या स्वप्नांचे काय झाले हा लोकांच्या मनात प्रश्न आहे. डॉ.कलाम यांनी देशासाठी पाहिलेल्या स्वप्नांतील अनेक बाबी प्रत्यक्षात उतरल्या आहेत. देशाला महासत्ता बनविण्यासाठी काही स्वप्न पूर्ण होण्याकडे मार्गक्रमण करत आहेत तर काहींना सत्यात आणण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे सृजन पाल सिंह यांनी सांगितले.ही आहेत कलामांची स्वप्नेडॉ.कलाम यांनी ‘इंडिया २०२० : अ व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ या नावाने एक पुस्तक लिहिले होते. २०२० पर्यंत भारताला विकसित व सक्षम देश बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या १० बाबींवर त्यांनी यात भर दिला होता. देशाला आर्थिक बाबतीत महासत्ता बनविणे, गाव व शहर यांच्यातील दरी कमी करणे, देशात शिक्षणाचा प्रसार होणे, भ्रष्टाचारमुक्त देश बनणे, लोकांना सामाजिक सुरक्षा व आरोग्याच्या सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, देशात कृषी व ‘फूड प्रोसेसिंग’चे उत्पादन दुप्पट करणे, गावांचे विद्युतीकरण व्हावे, ‘आयटी’ व शिक्षण क्षेत्रात ‘ई-गव्हर्नन्स’चा उपयोग करणे, ‘टेलिकम्युनिकेशन’ व ‘टेलिमेडिसीन’मध्ये वाढ, आण्विक तंत्रज्ञानाचा विकास, अंतराळ तंत्रज्ञान व संरक्षण तंत्रज्ञान मजबूत बनविणे इत्यादी बाबींचा यात समावेश आहे.देशविकासात तरुणांची महत्त्वाची भुमिकाडॉ.कलाम यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात तरुणांची संख्या अधिक आहे. कलाम यांचा तरुणाईच्या शक्तीवर विश्वास होता. देशविकासात तरुणांची भूमिका मौलिक असते, असे ते मानायचे. जोपर्यंत सामाजिक विषमता दूर होत नाही तोपर्यंत गाव व शहरे यांच्यातील दरी हटू शकत नाही व स्वप्नदेखील पूर्ण होऊ शकत नाही. मनभेदामुळे कलाम यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेत अडथळे येत आहेत. जोपर्यंत देशातील नागरिकांच्या मनात दरी उत्पन्न करणारे लोक त्यांच्या उद्दिष्टात सफल होत राहतील, तोपर्यंत डॉ.कलाम यांच्या स्वप्नांची पूर्तता होण्यास विलंब होत राहील, असे सिंह म्हणाले.स्वप्नपूर्तीच्या दिशेने काम सुरू आहेडॉ.कलाम यांच्या निधनानंतर आजदेखील त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याच्या दिशेने काम सुरू आहे. त्याला अद्याप हवा तसा वेग आलेला नाही. मात्र स्वप्नांमधील अनेक बाबी पूर्ण झाल्या आहेत. गाव व शहरे यांच्यातील दरी कमी होत आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देश आघाडीवर आहे. आरोग्य सेवांमध्ये सुधारणा होत आहेत. शिक्षणाचा प्रचार प्रसार होत असून गुणवत्तेवर जास्त भर दिल्या जात आहे, याकडे डॉ.सृजन पाल सिंह यांनी लक्ष वेधले.मुलांसोबत संवाद आवश्यकपालकांनी मुलांच्या हातात मोबाईल देण्याऐवजी त्यांना वेळ देण्याची आवश्यकता आहे, असे डॉ.कलाम म्हणायचे. रात्री जेवताना त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. त्यामुळे मुलांना आत्मियतेचा अनुभव येतो. सोबतच त्यांच्यात आत्मविश्वासदेखील निर्माण होतो. त्यांच्या सल्ल्यांवर अनेक पालके अंमलबजावणी करत आहेत, असे सृजन पाल सिंह म्हणाले. डॉ.कलाम यांचा विज्ञान व तंत्रज्ञानावर जोर होता. त्यांच़्या ‘व्हिजन २०२०’ मध्ये ही महत्त्वाची बाब होती. देशात संशोधन होत आहे. मात्र ते प्रयोगशाळेपुरते मर्यादित आहे. याला प्रयोगशाळेतून बाहेर काढून कार्यशाळेत पोहोचवणे आवश्यक आहे. शैक्षणिक संस्था व उद्योग क्षेत्रांत समन्वय वाढणेदेखील आवश्यक आहे, असे प्रतिपादन सिंह यांनी केले....तर कर्जमाफीची आवश्यकता पडणार नाहीशेतकऱ्यांची स्थिती सुधारावी यासाठी डॉ.कलाम यांनी शेतकऱ्यांना ‘इनपुट’, ज्ञान व ‘कनेक्टिव्हिटी’वर भर देण्याचा सल्ला दिला होता. जोपर्यंत शेतकरी या तिघांना एकत्रित करत नाही, तोपर्यंत ते आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ शकत नाही, असे ते म्हणायचे. सोबतच त्यांनी अन्न उत्पादन, प्रक्रिया, ‘मार्केटिंग’ यांच्यावर भर देण्यासदेखील सांगितले होते. जर शेतकऱ्यांना योग्य ‘इनपुट’ मिळाले तर त्यांना ‘सबसिडी’ किंवा कर्जमाफीची आवश्यकता भासणार नाही, असे सिंह म्हणाले.
‘व्हिजन २०२०’च्या पूर्ततेसाठी नागपुरात ‘कलाम’ केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 11:15 AM
माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी ‘व्हिजन २०२०’ अंतर्गत मांडण्यात आलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी देशभरात २००० विशेष केंद्र उघडण्यात येणार आहे.
ठळक मुद्देदेशभरात दोन हजार केंद्र उघडणार