नागपूर : मनुस्मृतीविरोधात अखिल भारतीय सर्ववर्गीय कलार समाजातील महिलांनी शुक्रवारी रेशीमबाग चौकातील जैन कलार समाजभवनपुढे निदर्शने करून धरणे आंदोलन केले. नव्याने प्रकाशित करण्यात आलेल्या सार्थ श्री मनुस्मृती पुस्तकात कलाल, कलार, तेली, सोनार, माळी, चांभार आदी समाजाबाबत आणि महिलांबाबत हीन लिखाण करण्यात आले आहे. २५ डिसेंबर १९२७ रोजी खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीची होळी केली होती. २२ वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारने या पुस्तकावर बंदी घातली असतानाही मराठीत भाषांतर करून या पुस्तकाचे नव्याने प्रकाशन करून विक्री केली जात आहे. विविध समाजाच्या भावना भडकवणाऱ्या या पुस्तकावर ताबडतोब बंदी आणून प्रकाशकाविरुद्ध भादंवि १५३-अ,ब कलमान्वये खटला भरण्यात यावा. फौजदारी संहितेच्या कलम ९५ अन्वये ही प्रकाशने जप्त करण्यात यावी, पुस्तक विक्रीवर बंदी घालण्यात यावी, आदी मागण्या आंदोलन करणाऱ्या कलाल, कलार, कलवार समाजातील महिलांनी यावेळी केल्या. अखिल भारतीय सर्ववर्गीय कलार समाजाचे अध्यक्ष भूषण दडवे आणि छाया जयस्वाल यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यात सुषमा जयस्वाल, मीना रॉय, कल्पना जयस्वाल, वीणा खानोरकर, नीता जयस्वाल, ज्योती मेहता, उर्मिला जयस्वाल, स्नेहल बिहारे, सरला जयस्वाल, कल्पना डाबरे, स्मिता जयस्वाल, कविता जयस्वाल, मंजुलता जयस्वाल, रिता जयस्वाल, रूपा जयस्वाल, मीना जयस्वाल, कांता बोरोले, पुष्पा चौरागडे, प्रभादेवी टाले, लता जयस्वाल, अलका मोहबंशी, नलिनी कटवार, शबरी नशिने, अनिता रॉय, मंगला जयस्वाल, अनिता महाजन, स्मृती जयस्वाल, अंजू सुरेश जयस्वाल आदींचा सहभाग होता. १४ एप्रिलपर्यंत या पुस्तकाच्या प्रकाशकाला अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. (प्रतिनिधी)
कलार समाज महिलांचे धरणे
By admin | Published: April 03, 2016 3:52 AM