नागपूर : कारगिलच्या युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी बंगळुरवरून आलेले २५ श्रद्धांजली कलश शनिवारी दुपारी २.३० वाजता राजधानी एक्स्प्रेसने नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचले. यावेळी महापौरांसह उपस्थित मान्यवरांनी श्रद्धांजली कलशाला अभिवादन केले. तर रेल्वेस्थानकावरील प्रवाशांनीही भारत माता की जयच्या घोषणा दिल्यामुळे रेल्वेस्थानकाच्या परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
कारगिल विजय दिनानिमित्त २६ जुलै रोजी कारगिलच्या युद्धात शहिद झालेल्या सैनिकांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी बंगळुरवरून २५ श्रद्धांजली कलश ०२६९१ बंगळुर-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसने नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक एकवर पोहोचले. सिटीझन सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने शहिदांच्या स्मृतीस्थळी अर्पण करण्यासाठी हे कलश दिल्लीला नेण्यात येत आहे. या कलशात विविध २७ नद्यांचे पवित्र जल आणि देशभरातील विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या विविध फुलांच्या पाकळ्या ठेवण्यात आल्या होत्या. २६ जुलैला हे श्रद्धांजली कलश दिल्लीच्या इंडिया गेट येथे पोहोचणार आहे. त्यानंतर हे पवित्र जल आणि फुलांच्या पाकळ्या शहिदांच्या स्मारकावर अर्पण करण्यात येणार आहे. यावेळी श्रद्धांजली कलश घेऊन जात असलेले कॅप्टन एस. सी. भंडारी, दिनेश, बी. पी. शिवकुमार, नारायण, कुमार स्वामी प्लॅटफार्मवर उतरले. रेल्वेस्थानकावर श्रद्धांजली कलशाला अभिवादन करण्यासाठी महापौर दयाशंकर तिवारी, रेल्वेस्थानकाचे संचालक दिनेश नागदेवे, उपस्टेशन व्यवस्थापक दत्तुजी गाडगे, कारगिल युद्धातील शहिद राजदेव रेड्डी यांची कन्या यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. वीर जवानांच्या बलिदानामुळे आपण सुखाचे आयुष्य जगत असून या शहीद जवानांचे बलिदान विसरणे अशक्य असल्याची भावना महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केली. रेल्वेस्थानकावर उपस्थित प्रवाशांनीही श्रद्धांजली कलशाला अभिवादन केले. यावेळी प्रवाशांनी भारत माता की जयच्या घोषणा देऊन रेल्वेस्थानकाचा परिसर दणाणून टाकला. त्यानंतर हे श्रद्धांजली कलश घेऊन राजधानी एक्स्प्रेस दिल्लीकडे रवाना झाली.
...............