दयानंद पाईकराव
नागपूर : १४२ वर्षांची परंपरा असलेली आणि कोरोनामुळे सलग दोन वर्षांपासून निघु न शकलेली विदर्भाची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेली मारबत-बडग्याची मिरवणूक शनिवारी उपराजधानीत उत्साहात साजरी झाली. ईडा पिडा...रोगराई....दृष्ट प्रवृत्ती आणि संकटांना घेऊन जा गे मारबत अशा घोषणा देत नागपुरात मारबत उत्सव साजरा झाला.
तऱ्हाणे तेली समाजाच्या पिवळ्या मारबतीला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वही आहे. तर काली मारबत ही पुतणा मावशीचे प्रतिक मानल्या जाते. स्वातंत्र्य लढ्यात या मारबतींच्या माध्यमातून देशभक्तीचे बीज रोवण्याचे काम करण्यात येत होते. तेंव्हापासून या उत्सवाने नागपुरच नव्हे तर अख्ख्या देशभरात आपली छबी उमटविली आहे. शनिवारी जागनाथ बुधवारी येथून निघणारी पिवळी मारबत आणि श्री देवस्थान पंचकमेटी इतवारी येथून निघणारी काळी मारबत यांचे मिलन नेहरु पुतळ्याजवळ झाले. या मिलनाचे विहंगम दृष्ट आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी अख्खे नागपूर नेहरु पुतुळ्याजवळ एकवटले होते. पुढे मारबत उत्सवाची मिरवणूक सुरु झाली. पुढे बडग्यांची मिरवणूक त्यावर विविध संदेश लिहिलेले फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. ढोल ताशा आणि डीजेच्या दणदणाटात तरुणाई थिरकत होती. इतवारीपासून ते बडकस चौकापर्यंत चारही बाजुंनी लोकांची गर्दी दाटली होती. अनेक नागरिक आपल्या कुटुंबीयांसह आणि लहान बालगोपालांना सोबत घेऊन हा अनोखा उत्सव पाहण्यासाठी आले होते.
बडग्यांनी ठेवले समाजातील अनिष्ट प्रथा, महागाईवर बोटमारबत-बडग्या उत्सवात एकुण १२ बडगे काढण्यात आले होते. यात बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, पेट्रोल दरवाढ आणि राजकीय परिस्थितीवर बोट ठेवणाऱ्या बडग्यांचा समावेश होता. यावेळी छत्रपती शिवाजी पार्क बडग्या उत्सव समिती मस्कासाथ रेल्वे पुलने भ्रष्टाचारी बडग्या काढला. समितीने भोंगे बंद झाले..फोकनाडे मारणारे जेलमध्ये बंद झाले....लवासा ओके...बारामती ओके..असे फलक लावले होते. पेट्रोल दरवाढीवर काढण्यात आलेल्या बडग्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. टिमकी मंडळाच्या वतीने लाल मारबत काढण्यात आली. अॅक्शन कमिटी एनजीओच्या वतीने अग्निवीर योजनेला समर्थन देणारा बडगा काढला होता. तर संग्राम बडग्या उत्सव समितीने पेट्रोल, डिझेल दरवाढ आणि महागाईकडे लक्ष वेधणाºया बडग्या माध्यमातून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. युवा शक्ती बडग्या उत्सव मंडळाने बेरोजगारी आणि पोलीस भरतीवर बडग्या काढला. छत्तीसगडी समाज बडग्या उत्सव मंडळाने महागाईकडे लक्ष वेधणारा बडग्या काढला होता. विदर्भ क्रांतीदल बडग्या उत्सव मंडळाने वेगळ्या विदर्भाच्या मागणीकडे लक्ष वेधणारा बडग्या काढला. बाल विद्यार्थी बडग्या उत्सव मंडळ मासुरकर चौकच्या वतीने गंगाजमुना वस्तीत चालणाऱ्या वेश्या व्यवसायाच्या विरोधात बडग्या काढला. तेली समाज बाल मित्र बडग्या उत्सव मंडळाने लोकशाहीची हत्या या विषयावर बडग्या काढून नागरिकांचे लक्ष वेधले.भुरी मारबतसेव्ह इंडिया फॅमिली फाऊंडेशनतर्फे पुरुषांवरील अत्याचाराकडे नागरिकांचे लक्ष वेधले. यात देशात दर नऊ मिनिटाला एक पुरुष आत्महत्या करीत असून ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुरुष आयोग गठीत करण्याची मागणी लाऊन धरली.
जालौर घटनेकडे बडग्यांनी वेधले लक्षराजस्थानमधील जालौर येथे माठातील पाणी पिल्यामुळे मुख्याध्यापकाने दलित समाजातील विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली. या मारहाणीमुळे त्या विद्यार्थ्याचा मृत्यु झाल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी मारबत उत्सवात दोन बडगे काढण्यात आले. शिवशक्ती बालमित्र बडग्या उत्सव मंडळ आणि अविघ्न बडग्या उत्सव मंडळाने कन्हैय्यालाल या विद्यार्थ्याच्या मृत्युप्रकरणी मारहाण करणाऱ्या शिक्षकाला फाशी देण्याची मागणी या बडग्याच्या माध्यमातून केली.