लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : कळमेश्वर-ताेंडाखैरी मार्गावरील पारडी(घटाटे)हा जाेड रस्ता रहदारीसाठी अतिशय धाेकादायक ठरत आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून, एखादे प्रवासी वाहन उलटून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कळमेश्वर तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे मजबुतीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यातच कळमेश्वर-तोंडाखैरी मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याचे काम सध्या सुरू असून, या मार्गावरील कळमेश्वर ते पारडी (घटाटे) जोड रस्त्यापर्यंतचा रस्ता मंजूर नसल्याचे समजते. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. दोन्ही बाजूने डांबरी रस्ता दबल्या गेला आहे तर, मधातील भाग उंच आला आहे. परिणामी, या मार्गाने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. प्रसंगी गाडीचा खालचा भाग रस्त्यावरील उंचवट्याला घासून वाहनात बिघाड होतो. या रस्त्याने पारडी (घटाटे), खंडाळा, वलनी, खैरी (लखमा), गोवरी, तोंडाखैरी, बोरगाव (धुरखेडा), बेल्लोरी आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने ये-जा करतात. त्यामुळे तोंडाखैरी रस्त्याबरोबरच या उर्वरित रस्त्याचेसुद्धा रुंदीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.