आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्य शासनाने अधिकाऱ्यावर कारवाईचे निर्देश दिल्यानंतरदेखील पावले न उचलणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी स्पष्ट केले. ‘कंडोमपा’च्या करनिर्धारक व संकलक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यासंदर्भात अॅड.अनिल परब यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.‘कंडोमपा’च्या करनिर्धारक व संकलक अनिल लाड हे दोन कंपन्यांच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार कोणत्याही शासकीय कर्मचाºयाने शासनाची मंजुरी मिळाल्याशिवाय इतर नोकरी स्वीकारता कामा नये. यासंदर्भात ‘मिनिस्ट्री आॅफ कंपनी अफेअर्स’ने लाड दोषी असल्याचा अहवाल पाठविला होता. याबाबत मार्च २०१६ च्या अधिवेशनातदेखील लक्षवेधी उपस्थित झाली होती. ११ जुलै २०१७ रोजी सभापतींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कारवाईचे निर्देश आयुक्तांना देण्यात आले होते. मात्र आयुक्तांनी शासनाकडे कारवाईसंदर्भात पत्राद्वारे मार्गदर्शन मागितले होते.जर स्पष्ट निर्देश होते तर त्यांनी मार्गदर्शन मागण्याची गरज नव्हती. लाड यांना निलंबित करण्यात येईल व शासनाच्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल ‘कंडोमपा’ आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असे उत्तर डॉ.पाटील यांनी सभागृहासमोर दिले.