नागपूर : जि.प.च्या पोटनिवडणूकीत तालुक्यातील दोन्ही जागा आणि पंचायत समितीत बहुमत मिळविल्यानंतर कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दमदार विजय मिळवीत काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपला धक्का दिला आहे.
जिल्ह्यातील कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शनिवारी झालेल्या निवडणूकीत काँग्रेस समर्थीत सहकार पॅनेलचे १४ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप समर्थीत एकता परिवर्तन पॅनलला दोन जागांवर विजय मिळविता आला आहे.
बाजार समितीच्या संचालक पदाच्या १८ जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. त्यात सहकार पॅनेलचे दोन उमेदवार आधीच अविरोध झाले होते. त्यामुळे बाजार समितीत सहकार पॅनेलचे संख्याबळ १६ झाले आहे. शनिवारी झालेल्या निवडणूकीची मतमोजणी रविवारी कामठी येथील सेठ कसरीमल पोरवाल कॉलेजच्या केंद्रावर करण्यात आली. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच सहकार पॅनेलच्या उमदेवारानी आघाडी घेतली होती.
या निवडणूक ९८२ पैकी ८८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बाजाविला होता. कामठी मतदार संघ भाजपचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांचा गड आहे. येथे भाजपचे टेकचंद सावरकर आमदार आहेत. तर, काँग्रेससाठी येथे मंत्री सुनील केदार आणि जि. प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी मोर्चेबांधणी केली होती.