कामठी : कामठी तालुक्यात गुरुवारपर्यंत ८,३०० नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर २८० जणांचा मृत्यू झाला. यात एक महिन्यात तब्बल १३७ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दररोज बाधित आणि मृत्यूंची संख्या वाढत असल्याने तालुका प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गत एक ते दीड महिन्यापासून तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. तालुक्यात शहरात दोन व ग्रामीण भागात आठ अशा १० टेस्टिंग टीम कार्यान्वित आहे. गुरुवारपर्यंत ५१,६१६ अँटिजेन व २४,१६९ आरटीपीसीआर अशा एकूण ७५,७८५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी ८,३०० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. आतापर्यंत ५,९१४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. सध्या तालुक्यात २,१३६ रुग्ण अॅक्टिव्ह असून, ३२ सुपर स्प्रेडर पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. शहरात आठ खासगी रुग्णालयासह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात २० बेडचे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. सध्या २,०६२ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.
तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांच्या संख्येने २८४ चा आकडा पार केला. एक महिन्यात तब्बल १३७ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.२५ टक्के आहे तर, मृत्यूदर ०३.३७ टक्के एवढा आहे.
३७,०९१ नागरिकांचे लसीकरण
तालुक्यात आतापर्यंत ३७,०९१ नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला आहे. लसीकरणाच्या दुसरा डोस ४,६३३ जणांनी घेतला. तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या आदेशान्वये गटविकास अधिकारी अंशुजा गराटे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड चाचणी केंद्र व लसीकरण केंद्र उभारले गेले आहेत. याला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु स्थानिक नगरपालिकेच्या उदासीन धोरणामुळे शहरात मात्र अल्प प्रतिसाद दिसून येत आहे.