नागपूर : समाजाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडातील दोषसिद्ध आरोपी गणेश ऊर्फ गोलू शिवभरण शाहू (२९), त्याची पत्नी गुडिया ऊर्फ गुड्डी (२५) व भाऊ अंकित (२४) यांनी शिक्षा निलंबन व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
अर्जावर न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वाल्मिकी मेनेझेस यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सत्र न्यायालयाने या तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गणेशचा एक नातेवाईक तरुण या हत्याकांडात चौथा आरोपी असून ही घटना घडली त्यावेळी तो अल्पवयीन होता. त्या तरुणासह गणेश व अंकित यांना पुरावे नष्ट करण्याच्या गुन्ह्यामध्ये प्रत्येकी तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय, चारही आरोपींवर त्यांच्या प्रत्येक गुन्ह्यामध्ये एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. सर्व आरोपी पवनपुत्रनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत. आरोपींनी उषा सेवकदास कांबळे (५४) व त्यांची दीड वर्षाची चिमुकली नात राशी कांबळे यांची हत्या केली, अशी तक्रार आहे.
शिक्षेविरुद्ध अपील दाखल
संबंधित तिन्ही आरोपींनी सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपीलही दाखल केले आहे. उच्च न्यायालयाने ते अपील अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतले आहे. आरोपींतर्फे ॲड. अद्वैत मनोहर तर, सरकारतर्फे ॲड. संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.