लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कांबळे दुहेरी खून खटला नागपूर सत्र न्यायालयातच चालेल यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. हा खटला दुसऱ्या राज्यात स्थानांतरित करण्यासाठी आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली. न्यायमूर्तीद्वय एस. अब्दुल नझीर व आर. सुभाष रेड्डी यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे आरोपींना जोरदार दणका बसला आहे.प्रकरणातील आरोपींमध्ये गणेश शिवभरण शाहू, गुडिया ऊर्फ गुड्डी गणेश शाहू, अंकित शिवभरण शाहू व एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. हा खटला चालवित असलेले अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. काझी हे राजकीय दबावात कार्य करीत असल्याचे आरोपींचे म्हणणे होते. सरकारने हा आरोप फेटाळून लावला. न्या. काझी यांच्यावर कोणताही दबाव नाही. आरोपींना स्वत:च्या संरक्षणासाठी भरपूर वेळ देण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने आरोपींविरुद्ध दोषारोप निश्चित केले असून एक साक्षीदारही तपासण्यात आला आहे असे सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता आरोपींची याचिका खारीज केली.आरोपींवर उषा कांबळे व त्यांची चिमुकली नात राशी यांचा खून केल्याचा आरोप आहे. ही घटना १७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली होती. घटनेच्या दिवशी आरोपी व उषा कांबळे यांच्यामध्ये भिसीच्या पैशांवरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीड वर्षीय राशीचाही निर्घृण खून केला. त्यानंतर दोघांचेही मृतदेह नाल्यात फेकून दिले. आरोपी पवनपुत्रनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत. सर्वोच्च न्यायालयात आरोपींतर्फे अॅड. गगन सांगी व अॅड. सिद्धार्थ धर्माधिकारी, सरकारतर्फे अॅड. निशांत काटनेश्वरकर तर, फिर्यादी रविकांत कांबळे यांच्यातर्फे अॅड. सचिन पुजारी यांनी कामकाज पाहिले.
कांबळे दुहेरी खून खटला नागपुरातच चालणार : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:24 AM
कांबळे दुहेरी खून खटला नागपूर सत्र न्यायालयातच चालेल यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. हा खटला दुसऱ्या राज्यात स्थानांतरित करण्यासाठी आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली. न्यायमूर्तीद्वय एस. अब्दुल नझीर व आर. सुभाष रेड्डी यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे आरोपींना जोरदार दणका बसला आहे.
ठळक मुद्दे खटला स्थानांतरणाची याचिका फेटाळली