लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात रेतीचा उपसा करण्यासाठी कन्हान तर रसायनयुक्त व सांडपाणी साेडण्यासाठी काेलार नदीचा वापर केला जात आहे. या दाेन्ही नद्यांचा उगम मध्य प्रदेशातून झाला आहे. रेतीच्या वारेमाप उपशामुळे कन्हान मृतवत तर रसायनयुक्त पाण्यामुळे काेलार नदी प्रदूषित झाल्याने या दाेन्ही महत्त्वाच्या नद्यांचे अस्तित्व धाेक्यात आले आहे.
बाजारात तांबड्या रेतीला भरीव मागणी असल्याने रेती तस्करांनी कन्हान नदीला लक्ष्य केले आहे. जिल्ह्यात या नदीवर सावनेर तालुक्यात २१, पारशिवनी तालुक्यात सहा, कामठी तालुक्यात चार तर माैदा तालुक्यात चार असे एकूण ३५ रेतीघाट आहेत. यातील १९ घाटांमधून काेणत्याही घाटाचा लिलाव झाला नसताना रेतीचा माेठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे. त्यामुळे पात्रात खड्डे तयार झाले आहेत. या नदीवरील बिना संगम (ता. कामठी) घाटात नदीचा काठ खाेदला जात असून, तेथील मातीची नागपूर शहरात विक्री केली आहे. या नदीने अद्याप प्रवाह बदलविला नसला तरी माती खाेदकामामुळे प्रवाह बदलण्याची तसेच काठच्या गावांना पुराचा धाेका उद्भवण्याची शक्यता बळावली आहे.
काेलार नदीच्या पात्रात रसायनयुक्त व काठावरील शहरे व गावांमधील सांडपाणी साेडले जात असल्याने ही नदी प्रदूषित झाली आहे. परिणामी, पात्रात माेठ्या प्रमाणात जलपर्णीचे साम्राज्य तयार झाले आहेे. या नदीच्या पाण्याचा रंग काळसर झाला असून, या प्रदूषित पाण्यामुळे काठच्या गावांमधील पाणीपुरवठा याेजनाही प्रभावित झाल्या आहेत. या गंभीर प्रकाराकडे महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानेही डाेळेझाक केली आहे.
....
वनसंपदा धाेक्यात
अलीकडच्या काळात नदीकाठची वनसंपदा व हिरवळ नष्ट झाली आहे. त्यामुळे पशुपक्ष्यांचा नदीकाठचा अधिवास नाहीसा झाला आहे. पक्ष्यांच्या विष्ठेत फळांच्या बिया राहत असल्याने त्या बियांपासून झाडे उवगतात. पक्षी नदीकाठी फिरकत नसल्याने नवीन झाडे उगवण्याची प्रक्रिया थांबली आहे. झाडे नष्ट हाेत असल्याने पुरात काठची माती वाहून जाते. जमिनीची धूप टाळण्यासाठी काठावर बांबूची माेठ्या प्रमाणात लागवड करणे आवश्यक आहे, अशी माहिती जल व पर्यावरण तज्ज्ञ मिलिंद बागल यांनी दिली.
....
पाण्याचे दुर्भिक्ष्य
काही वर्षांपासून नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. पात्रातील रेतीचा वारेमाप उपसा हाेत असल्याने जमिनीत पाणी झिरपण्याची प्रक्रिया मंदावली आहे. जमिनीतील पाण्याचा वाढलेला उपसा लक्षात घेता भूगर्भातील जलस्तर खालावत चालल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. जिल्ह्यात पेंच, वर्धा, जाम, सूर, सांड, आम, नाग, वेणा, कृष्णा, मरू, चंद्रभागा या प्रमुख नद्यांची अवस्था काहीशी अशीच आहे.