नागपूर : कन्हानच्या इंदिरानगर येथे ठार मारण्याच्या हेतूने करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणी कुख्यात गुंडाच्या टोळीचा म्होरक्या योगेंद्र फुलसिंग यादव याचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश विजयकुमार शुक्ला यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला तर दोघांना जामीन मंजूर केला. जामीन मिळालेल्यांमध्ये आशिष बाळकृष्ण दुनेदार (२१) आणि बीपीन रामेश्वर गोंडाणे (२०) यांचा समावेश असून ते कन्हान येथीलच रहिवासी आहे. कमलेश हरिचंद्र मेश्राम आणि त्याचे साथीदार तसेच योगेंद्र यादव आणि त्याचे साथीदार हे कन्हान येथील योग बारमध्ये एकत्र बसून दारू प्याले होते. या ठिकाणी त्यांचे भांडण झाले होते. योगेंद्रने भांडणाचा सूड घेण्याचे ठरवले होते. २४ मार्च २०१५ च्या रात्री ११.३० वाजताच्या सुमारास योगेंद्र यादव आणि त्याच्या दहा-बारा साथीदारांनी कमलेशचे घर गाठले होते. त्यावेळी कमलेश घरी नव्हता. घरात घुसून त्यांनी कमलेशचा भाऊ नितेश आणि घरच्या लोकांवर हल्ला करून गंभीररीत्या जखमी केले होते. गोळीबारही केला होता. परत जातेवेळी त्यांना कमलेश आणि साथीदार येताना दिसताच त्यांच्यात धुमश्चक्री होऊन योगेद्रने गोळीबार केला होता.न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील वसंत नरसापूरकर तर आरोपींच्यावतीने अॅड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
कन्हान गोळीबार प्रकरण ; म्होरक्याचा जामीन फेटाळला
By admin | Published: September 13, 2015 3:04 AM