नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदीला आलेल्या पुरामुळे कुही तालुक्यातील चिचघाट, चापेगडी, सावंगी, कन्हेरीखुर्द, मोहगांव, आगरगाव, राजोला ययासह अन्य गावातील कापूस आणि सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच जमीन खरडून गेल्याने शेती योग्य राहिलेली नाही. त्यात किड व रोगाचा उद्रेक झाल्यामुळे उरलसुरले सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त भागाची महसूल व कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली. पाहणी दौऱ्यात आमदार राजू पारवे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे, पंचायत समिती सभापती वंदना मोटघरे, उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तसरे, तहसिलदार शरद कांबळे, कृषि महाविद्यालय, नागपूर येथील शास्त्रज्ञ डॉ बाळू चौधरी,राजेश जारोंडे, जिल्हा परिषद सदस्य अरुण हटवार, तालुका कृषि अधिकारी यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक व शेतकरी सहभागी झाले होते.
राजू पारवे यांनी नुकसानग्रस्त शेतकरी, विमा कंपनीचे प्रतिनिधी, कृषि विभागाचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचेशी चर्चा केली. नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.