लाेकमत न्यूज नेटवर्क
पिपळा (डाकबंगला) : सावनेर तालुक्यातील कन्हान नदीवरील लिलाव झालेल्या व न झालेल्या घाटांमधून रेतीचा राेज माेठ्या प्रमाणात अवैध उपसा केला जात आहे. ती रेती अमरावती जिल्ह्यात विक्रीसाठी पाठविली जात असून, रेतीचे बहुतांश ट्रक व टिप्पर ओव्हरलाेड असतात. ही बाब महसूल व पाेलीस विभागातील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना माहिती आहे. मात्र, कुणीही कारवाई करण्याच्या भरीस पडत नसल्याने राज्य शासनाचा काेट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.
जिल्हा प्रशासन व खनिकर्म विभागाने कन्हान नदीवरील काही घाटांचे लिलाव केले असले तरी त्याची पहिल्या वर्षाची मुदत संपत आली आहे. मात्र, घाट मालकांनी लिलाव घेतलेल्या घाटांसाेबत लिलाव न झालेल्या घाटांमधूनही पाेकलेन मशीनद्वारे अवैध उपसा करीत आहेत. यातील काही रेती नागपूर शहर तर काही रेती कळमेश्वर-गाेंडखैरी- काेंढाळी मार्गे तसेच सावनेर-काटाेल-जलालखेडा मार्गे अमरावती जिल्ह्यात नेली जाते. या रेतीची वाहतूक ही मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत अव्याहतपणे सुरू असते.
रेतीवाहतुकीचे ओव्हरलाेड ट्रक व टिप्पर पाच ते सात पाेलीस ठाण्यांची हद्द ओलांडून अमरावती जिल्ह्यात दाखल हाेतात. मात्र, ते ट्रक एकाही पाेलीस ठाण्याच्या पाेलीस कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास कधीच पडत नाही, याचे मात्र नवल व्यक्त केले जात आहे. ही बाब महसूल विभागातील अधिकाऱ्यांनाही माहिती आहे. केवळ ‘अर्थ’पूर्ण संबंधांमुळे कुणीही रेतीवाहतुकीचे ट्रक व टिप्पर पकडत नाही. प्रसंगी जुजबी कारवाई केली जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
....
नदीचा प्रवाह बदलला
पिपळा (डाकबंगला) परिसरातील एका घाटाचा लिलाव करण्यात आला असला तरी घाटमालक लिलाव न झालेल्या लगतच्या घाटातून रेतीचा उपसा करीत आहे. त्यामुळे त्या घाटात माेठमाेठे खड्डे तयार झाले आहेत. शिवाय, घाटातून रेतीचे ट्रक व पाेकलेन मशीन बाहेर काढणे तसेच नदीपलीकडे जाणे सुकर व्हावे म्हणून घाटमालकांनी पात्रात रॅम्प तयार केले आहेत. खड्डे व रॅम्पमुळे काही घाटांमध्ये नदीचा प्रवाह बदलला आहे.
...
रेतीचाेरट्यांच्या हस्तकांचा वावर
रेतीचाेरट्यांनी रेतीघाट आणि वाहतुकीच्या मार्गावर काही महत्त्वाचे पाॅईंट तयार केले आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या हस्तकांचा सतत वावर असताे. ते पाेलीस व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या हालचालींची बारीकसारीक माहिती वेळाेवेळी घाटमालकांसाेबत ट्रक व टिप्परचालकांना देतात. या रेतीचाेरीला आळा घालण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेकदा महसूल व पाेलीस विभागाकडे तक्रारी केल्या. यात सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. मात्र, कुणीही याकडे लक्ष देत नाही.
===Photopath===
290521\img_20210528_223833.jpg
===Caption===
कन्हान नदी वरून रात्रीच्या सुमारास अवैध रेती वाहून नेणारा अमरावती जिल्हातील लांब पल्याचा ट्रक