आॅनलाईन लोकमतनागपूर : राग यमनमधील आरोह-अवरोह असेल किंवा भैरवीची सुरेल तान. अमुक एका घराण्याचा गायक यमन गातो, म्हणून यमन श्रेष्ठ आणि तमुक एका घराण्याचा गायक भैरवी गातो म्हणून ती कनिष्ठ ठरेल का? संगीत अजरामर आहे. कारण ते कुणा एकाच्याच मालकीचे नाही, कुणाचेही दास नाही. संगीत अखंड आहे, स्वयंभू आहे, शाश्वत आहे. भौतिकतेच्या पलीकडे असे जे आहे ते संगीत सर्व भेदांपासून मुक्त आहे. हा संदेश 'संगीत कट्यार काळजात घुसली या नाटकाने नव्याने दिला. निमित्त होते स्वरवेध नागपूर या संस्थेच्या १४ वर्षांच्या प्रवासपूर्तीचे. पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या लेखणीने व पंडित जितेंद्र अभिषेकींच्या संगीताने नटलेले हे संगीतनाटक शनिवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात सादर झाले. या नाटकाला उसळलेल्या नागपूरकरांच्या गर्दीने आधुनिक मनोरंजनाच्या युगातही संगीत नाटकांच्या रसिकमान्यतेवर नव्याने मोहोर उमटवली. खाँसाहेब आफताब हुसेन यांच्या भूमिकेतील प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या अभिनयाने या नाटकाला नेहमीप्रमाणे कलास्वादाच्या एका वेगळ्या उंचीवर नेऊन संपवले. पडदा उघडला तेव्हा पंडित भानुशंकर यांची श्रीमंत हवेली बघताच प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला. हरवले मधूर मुरलीचे सूर...या नाट्यपदाने नाटकाचा प्रारंभ होतो. दोन संगीत घराण्यांतल्या संघर्षाची ही कथा नाट्यमय वळण घेत पुढे सरकत राहते. खाँसाहेबाच्या अट्टाहासापुढे त्यांना राजगायकाची पदवी मिळवून देत पंडितजींनी पत्करलेला विजनवास, त्यांची मुलगी रमाचे हवेली सोडणे, खाँसाहेबाचे हवेतील आगमन, सदाशिव गुरवचे मिरजेहून हवेलीत येणे, संगीत शिकण्यासाठीचे खेळलेले डावपेच, पंडितजींच्या गायकीपेक्षा आपली गायकी श्रेष्ठ आहे हे सिद्ध करताना स्वत:च्याच नजरेत पडत चाललेले आणि सदाशिवचे वास्तव उघड झाल्यावर एक खून माफ असतानाही हातातील कट्यार म्यान करणारे खाँसाहेब...असे सारेच प्रेक्षकांना स्तब्ध करणारे. सृष्टीच्या रचनाकाराने गाता गळा हा बरोब्बर मेंदू आणि हृदयाच्या मधोमध का ठेवलाय याचे उत्तर या नाटकाने अप्रतिम पद्धतीने दिले. आपल्या नागपूरचेच पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या सिद्धहस्त लेखणीने आणि सुबोध भावेच्या प्रयोगशील दिग्दर्शनाने या नाटकाचे सोने केले. राहुल देशपांडे यांच्यासह रमा व झरीनाच्या भूमिकेतील अस्मिता चिंचाळकर, दीप्ती माटे यांनी कमाल केली. ऋषिकेश बडवे आणि चिन्मय पाटसकर यांनीही आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला.घेई छंद मकरंद..., सूर निरागस हो..., तेजोनिधी लोहगोल...लागी करजवा कट्यार...या नाट्यपदांनी या नाटकाला संगीताचे एक अभिजात सौंदर्य बहाल केले. नाटकातील गायकांना संवादिनीवर राजेश परांजपे व तबल्यावर अॅड. भानुदास कुलकर्णी, सचिन बक्षी यांनी सहसंगत केली.शेवटचा प्रयोग ठरला ऐतिहासिकवसंतराव देशपांडे संगीत सभा या संस्थेने या नाटकाचे अनेक यशस्वी प्रयोग केले. देश-विदेशतील मराठी प्रेक्षकांनीही या नाटकाला अक्षरश: डोक्यावर घेतले. परंतु आता या संस्थेने हे नाटक थांबविले आहे. नागपुरात शनिवारी झालेला या संस्थेचा हा शेवटचा प्रयोग होता. नागपूरकरांच्या तुफान गर्दीने हा प्रयोग या नाटकाइतकाच ऐतिहासिक ठरला.