लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी ‘एनटीए’तर्फे घेण्यात आलेल्या ‘नीट’चा(नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट) निकाल बुधवारी जाहीर झाला. महाविद्यालयांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार निकालांमध्ये यंदा सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी करण अग्रवाल याने उपराजधानीतून अव्वल क्रमांक पटकाविला आहे. त्याला ७२० पैकी ६७० गुण प्राप्त झाले व अखिल भारतीय पातळीवर त्याचा २६२ वा क्रमांक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पात्र विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढलेली दिसून येत आहे.५ मे रोजी ‘नीट’चे आयोजन करण्यात आले होते. शहरातील ५० परीक्षा केंद्रांवर २४ हजारांहून अधिक परीक्षार्थी सहभागी झाले होते. करणपाठोपाठ भवन्स बी.पी.विद्यामंदिरची विद्यार्थिनी सायली देबडवार हिने दुसरा क्रमांक पटकाविला. अखिल भारतीय पातळीवर तिचा ७६८ वा क्रमांक आहे. तर सेंट पॉल महाविद्यालयाचाच विद्यार्थी अनिरुद्ध जाधव याने ६५० गुणांसह (अखिल भारतीय क्रमांक-१००७) तृतीय क्रमांक मिळविला. याशिवाय सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाची वैष्णवी रोकडे (६३८ गुण), शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा अभिषेक गणोरकर (६२३ गुण), सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा वेदांश सांघी (६२१ गुण), त्याच महाविद्यालयाची चैताली हटवार (६१५ गुण) यांनीदेखील यश संपादित केले. ‘नीट’च्या निकालांमध्ये यंदा सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बाजी मारल्याचे दिसून आले.सरावातूनच मिळाले यश : करण अग्रवालशहरातून प्रथम आलेल्या करण अग्रवाल याने अपेक्षेनुरुप यश मिळाल्याचे सांगितले. मी कधीही अभ्यासाचा फारसा तणाव घेतला नाही. मात्र दररोज ६ ते ७ तास अभ्यास सुरू होता. विशेषत: ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकांतून अभ्यास केला. सोबतच नियमित सराव सुरूच होता. अखेरच्या दिवसांत पेपर्स सोडविण्यावर लक्ष केंद्रित केले. फिजिक्स माझा आवडता विषय आहे. पुढे जाऊन नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ‘एमबीबीएस’ करायचे आहे. माझ्या यशाचे श्रेय मी माता-पिता व शिक्षकांना देतो, असे करणने सांगितले. करण हा वानखेडे मॅडम्स अॅकेडमीचा विद्यार्थी होता. त्याचे वडील उमेश अग्रवाल व आई सुनिता अग्रवाल दोघेही डॉक्टर आहेत.६०० हून अधिक गुण मिळविलेले विद्यार्थीविद्यार्थ्याचे नाव गुण महाविद्यालय१ करण अग्रवाल ६७० सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय२ सायली देबडवार ६५५ भवन्स बी.पी.विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स३ अनिरुद्ध जाधव ६५० सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय४ वैष्णवी रोकडे ६३८ सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय५ अभिषेक गणोरकर ६२३ शिवाजी विज्ञान महाविद्यालय६ वेदांश सांघी ६२१ सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय७ चैताली हटवार ६१५ सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालय‘सर्व्हर डाऊन’मुळे निकाल पाहण्यास उशीर‘नीट’चे निकाल संकेतस्थळावर जाहीर झाले. मात्र काही वेळातच संकेतस्थळ संथ झाले. ‘सर्व्हर डाऊन’ झाल्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात प्रचंड आडचण आली. सायंकाळी ६ वाजतादेखील ‘सर्व्हर डाऊन’च असल्याने विद्यार्थी आणि पालक प्रचंड वैतागले होते.