नागपूर : इंग्रजीची शिक्षिका असलेल्या आईला वाचनाची प्रचंड आवड. वाचनाचा छंद एवढा गाढा हाेता की घरी शेकडाे पुस्तकांची लायब्ररीच तयार झाली. मात्र यावर्षी काेराेनाने त्यांचे निधन झाले आणि ही ग्रंथसंपदा पाेरकी झाली. मात्र मुलांनी आईच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी या ग्रंथसंपदेचाच आधार घेतला. या गाेळा झालेल्या पुस्तकांचे वाचनालय सुरू करून वाचकांसाठी नि:शुल्क सेवा सुरू केली.
राजेश्वरी सुखदेवे यांचे यावर्षी २९ जून राेजी ६२ व्या वर्षी काेराेनाने निधन झाले. राजेश्वरी या इंग्रजीच्या शिक्षिका हाेत्या व निवृत्तीनंतरही त्यांचे अध्यापनाचे कार्य चालले हाेते. त्यांना असलेला वाचनाचा छंद हा नातलग व परिचितांसाठीही कुतूहलाचा विषय हाेता. आवडलेली पुस्तक घेऊन आणायची आणि वाचून फडशा पाडला की दुसरे पुस्तक घ्यायची. जे.के. राेलिंग यांच्या हॅरी पाॅटर सिरीजपासून चेतन भगतपर्यंत देशीविदेशी लेखकांच्या वेगवेगळ्या विषयांवरील २०० च्यावर पुस्तक त्यांच्या संग्रही जमा झाली. त्यांच्या वाचनाचा छंद मुलामध्येही आला. आता त्या नाहीत पण ही ग्रंथसंपदा त्यांची स्मृती जागविणाऱ्या आहेत.
आईच्या या स्मृती कायम राहाव्या आणि ज्ञानार्जनाचा हा वसा इतरांपर्यंत पाेहचावा म्हणून एक अनाेखा विचार मुलांच्या मनात आला. मुलगा राैनक आणि मुलगी निकिता सुखदेवे-अराेरा यांनी आईने गाेळा केलेल्या पुस्तकांचे वाचनालयच सुरू केले. वाचनाची आवड असलेल्यांनी यावे आणि केवळ आधार कार्ड दाखवून वाचनालयातून नि:शुल्क पुस्तक घेऊन जावे. वाचून झाले की परत करावे, एवढी माफक अपेक्षा. निकिता यांच्या माधवनगरच्या घरी हे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. राैनकने गाेळा केलेल्या पुस्तकांची भरही यात पडली आहे. विशेष म्हणजे अनेक मित्रांनी संपर्क करून त्यांच्या संग्रहातील पुस्तकेही देऊ केली आहेत. वाचनाचा छंद जाेपासणाऱ्या आईला वाचनीय आदरांजली देताना माेबाईल, इंटरनेटमध्ये गुरफटलेल्यांना पुस्तकांपर्यंत घेऊन जाण्याचाही उद्देश काैतुकास्पद उपक्रमातून सफल हाेत आहे.