लाेकमत न्यूज नेटवर्क
मोहपा : कळमेश्वर तालुक्यात दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. रुग्णसंख्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी शासनाने लसीकरणासह विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरी व ग्रामीण भागात नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून आठवडी व गुरांच्या बाजारावर बंदी घातली आहे. आठवडी बाजार बंद असल्यामुळे भाजीपाला उत्पादक आणि छाेटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
भाजीपाला उत्पादकांना मिळेल त्या किमतीत भाजीपाला विकावा लागत आहे. केवळ आठवडी बाजारात भाजीपाला विकणाऱ्यांचा व्यवसाय बुडाला आहे. विविध वस्तू व साहित्य, खाद्यपदार्थ, चहा, नाश्ता, कपडे, धान्य, खेळणी, पेय व इतर साहित्य विकून गुजराण करणारे संकटात सापडले असून, गुरांच्या बाजारात गुरे खरेदी-विक्री करून पोट भरणारे हवालदिल झाले आहेत.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने व्यावसायिकांना सकाळी ९ ते ५ पर्यंत दुकाने उघडी ठेवण्यासाठी मुभा दिलेली आहे. परंतु, ही वेळ पुरेशी नसल्याचे दुकानदारांची ओरड आहे. कारण शनिवार व रविवारी दुकाने पूर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश आहेत. लग्नसराईच्या दिवसात व्यवसायाला उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. मागील उन्हाळ्यात, लग्नसराईत अनेक व्यवसायांना मोठा फटका बसला होता. यंदा मोठ्या उत्साहाने अनेक व्यावसायिकांनी मालाची मोठी खरेदी केली आहे. परंतु सुरुवातीलाच पुन्हा लग्नसमारंभावर निर्बंध आले आहेत. लग्नसराईच्या तोंडावर बाजारातून ग्राहक कमी होताना दिसून येत आहे. परिणामी, ग्रामीण व शहरी भागातील व्यवसाय डबघाईस आले आहेत. तर एकमेकांवर आधारित उद्योग पुन्हा मंदीच्या खाईत जात आहेत. सर्व खबरदारी व सूचना देऊन नगर परिषद प्रशासन, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने व्यावसायिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. ग्रामीण भागातील व्यवसाय व बाजारांना दिलेले वेळेचे बंधन हटवावे, अशी मागणी होत आहे.
....
माझ्यासारख्या अनेकांची गुजराण फक्त आठवडी बाजारावर अवलंबून आहे. बाजार बंद केल्याने उपासमारीची वेळ येणार आहे. शासनाने यावर मार्ग काढून आठवडी बाजार पूर्ववत सुरू करावेत.
- विलास बगडे, खाद्यपदार्थ विक्रेता, मोहपा