लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात करीम लाला मानकापूरच्या कल्पना टॉकीजजवळ जुगार व लुडो गेमचा अड्डा चालवीत होता. या अड्ड्यावर येणाऱ्यांना तो एमडी पुरवित होता. एमडीची विक्री व लुडो गेममध्ये करीम मालामाल झाला. पोलिसांनी रंगेहात पकडल्यानंतरही तो पोलिसांपुढे तोंड उघडत नाही.
गुन्हे शाखेने करीम लाला याला दोन लाख रुपयांच्या एमडीसोबत पकडले होते. करीमची मानकापूर, कोराडी, गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत आहे. गुन्हेगारीत सक्रिय असलेला करीम जुगार, मटका अड्डा संचालित करीत होता. अड्ड्यावर येणाऱ्या ग्राहकांना तो एमडीची तस्करी करीत होता. एमडीची सवय लागल्यानंतर करीम त्यांची फसवणूक करीत होता. लुडो गेमवर त्याने जुगार सुरू केला होता. ग्राहकांना मोठा डाव हारण्यासाठी प्रवृत्त करीत होता. एमडीच्या नशेमुळे ग्राहक त्यात मोठी रक्कम हारत होता. याची भणक ग्राहकाला नशा उतरल्यानंतर होत होती. अशा फसवेगिरीमुळे करीम लाला मालामाल होत गेला. एक-दोन ग्राहकांनी पोलिसांना सूचना दिली होती. पण पोलिसांकडून विशेष कारवाई झाली नाही. त्यामुळे करीमचा अवैध धंदा चांगलाच वाढला.
सूत्रांच्या मते जुगार, सट्टा, एमडीच्या तस्करीबरोबर करीमने गुंडागर्दीतही दबदबा बनविला होता. मानकापूर परिसरातील अनेक नागरिक त्याच्या दहशतीमुळे त्रस्त होते. यात परिसरातील महिलासुद्धा होत्या. करीम रस्त्यावर चालणाऱ्याला मारपीट करीत होता. परिसरातील जमिनीवर त्याने कब्जा केला होता. मोंटी भुल्लर हत्याकांडात त्याचा सहभाग होता. सामान्य पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये त्याची दहशत होती. त्याने दोन वेळा पोलिसावर हल्ले केले होते. त्यामुळे पोलीससुद्धा त्याच्याविरुद्ध कारवाई करीत नव्हते.
एक आरोपी शहरात लपला आहे
एमडी तस्करीत क्रिकेट बुकीसह अनेक गुन्हेगार जुळले आहेत. यातील तीन लोकांची नावे समोर आली आहेत. एक आरोपी शहरात लपला आहे. दुसऱ्याने राज्याबाहेर पलायन केले आहे. लोकांनी करीम व त्याच्या टोळीविरुद्ध मकोकाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.