लोकमत न्यूज नेटवर्कनरखेड : ‘व्हॉटसअप’ या सोशल मीडियावरील चर्चेतून डॉक्टरला बेदम मारहाण आणि अर्धनग्न धिंड काढल्याच्या कारणामुळे नरखेडमध्ये तणावाचे वातावरण झाले आहे. या घटनेच्या निषेधात शुक्रवारी (दि. ४) नरखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान नरखेडमध्ये जवळपास सहा हजारांवर नागरिकांनी मोर्चा काढत शक्तीप्रदर्शन केले. पोलिसांचा चोख बंदोबस्त नरखेडमध्ये असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. डॉक्टरला मारहाण, एकाच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी नरखेड पोलिसांनी आतापर्यंत १३ आरोपींना अटक केली आहे. सध्या नरखेडमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.‘व्हॉटसअप’वर एका ग्रुपमध्ये देशभक्ती या विषयाला धरून बुधवारी रात्री चर्चा सुरू होती. त्यात दोन गटाचे नागरिक सहभागी होते. दोघेही आरोप-प्रत्यारोप करू लागले. त्यातून वाद उद्भवला. त्यामुळे एका गटाच्या १०० ते १५० नागरिकांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास डॉ. सुभाष ज्ञानेवर वाघे यांच्या क्लिनिकवर हल्ला चढविला. तेथील साहित्याची नासधूस करीत डॉ. वाघे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांची धिंड काढत गुरमुळे ले-आऊटपर्यंत आणले. तेथे रामेश्वर शेंदरे यांच्या घरावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. थोड्याच वेळात ही माहिती शहरात पसरताच दोन्ही गटाने पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली.दरम्यान या प्रकारामुळे नरखेडकरांनी संतापून शुक्रवारी ‘नरखेड बंद’चे आवाहन केले होते. त्यानुसार जवळपास सहा हजारांवर नागरिकांचा सहभाग असलेला मोर्चा सकाळच्या सुमारास निघाला. हा मोर्चा पोलीस ठाण्याच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला असता एक आरोपी जमावाला दिसला. त्यामुळे त्यांनी त्याला पकडले. त्याला काही करण्यापूर्वीच पोलीस तेथे पोहोचून त्याला ताब्यात घेतले आणि पोलीस वाहनात टाकून पोलीस ठाण्यात आले. त्यामुळे अनर्थ टळला.हा मोर्चा पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना भेटले. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मोर्चाचे विसर्जन करण्यात आले.शिष्टमंडळात श्यामराव बारई, नगराध्यक्ष अभिजित गुप्ता, रमेश कोरडे, किशोर राय, मनीष दुर्गे, किशोर रेवतकर, राजू हरणे, विनायक पिंजरकर, सुरेश शेंदरे लहू वैद्य, सुनील सोनटक्के, साहेबराव वघाळे आदी सहभागी झाले होते. शहरातील बाजारपेठ, भाजीबाजार, शाळा -महाविद्यालये पूर्णत: बंद होते. शहरातील प्रत्येक चौका-चौकात पोलीस तैनात असल्याने कर्फ्युसदृश स्थिती होती.पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे, विक्रम कदम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे, सहायक पोलीस निरीक्षक तामटे, अहेरकर, चार पोलीस उपनिरीक्षकांसह १६० पोलिसांचा ताफा नरखेडमधील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.१३ आरोपींना १० आॅगस्टपर्यंत ‘पीसीआर’जखमी डॉ. वाघे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ३२६, ३४२, २९४, ५०६, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला. तर रामेश्वर शेंदरे यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ४५२, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणात रात्री तीन तर शुक्रवारी सकाळपर्यंत एकूण १३ आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्या सर्वांना नरखेड येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी पुरी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्हीकडील बाजू ऐकून आरोपींना १० आॅगस्टपर्यंत ‘पीसीआर’ (पोलीस कस्टडी रिमांड) सुनावला. त्यानंतर १३ आरोपींपैकी काहींची काटोल तर काहींची जलालखेडा पोलीस ठाण्यात पाठविले. आरोपींना न्यायालयात हजर करतेवेळी तगडा पोलीस बंदोबस्त होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शहबाज शफी सिद्दिकी (३४, र. जुनी कामठी), शाहजाद ऊर्फ सलिम अब्दुल जब्बार कुरेशी (२६), नावेद गफ्फार पठाण (२०), ईस्ताक शेख ऊर्फ गोलू इंद्रिस शेख (२४), तौसिफ शेख जाकीर (२६), इमरान शेख इकबाल शेख (२८), मोहम्मद शरीफ सिद्दीकी (४३), शेख परवेज शेख सत्तार (३०), सोहेब पठाण नसीर पठाण (२०), इरशाद इकबाल राजवाणी (२१), सलमान शेख इद्रीस शेख (२४), उबेद जफर सिद्दीकी (२०) आणि जुनेद जफर सिद्दीकी (२३) सर्व रा. नरखेड यांचा समावेश आहे.डॉ. वाघेंविरुद्ध गुन्हा दाखल‘व्हॉटसअप ग्रुप’वर विशिष्ट समुदायाबाबत डॉ. सुभाष ज्ञानेश्वर वाघे यांनी बुधवारी रात्रीच्या सुमारास विवादास्पद संदेश पोस्ट केला. त्यावरून सुरू झालेल्या चर्चेचे रूपांतर गुरुवारी त्यांच्या मारहाणीत झाले. त्यामुळे सोशल मीडियावर विवादास्पद संदेश पोस्ट केल्याप्रकरणी डॉ. वाघे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९५ (अ), ५०४, ५०६ अन्वये नरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
नरखेडमध्ये कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 2:07 AM
‘व्हॉटसअप’ या सोशल मीडियावरील चर्चेतून डॉक्टरला बेदम मारहाण आणि अर्धनग्न धिंड काढल्याच्या कारणामुळे नरखेडमध्ये तणावाचे वातावरण झाले आहे.
ठळक मुद्देसोशल मीडियावरील वादातून डॉक्टरला मारहाण : हजारो नागरिकांनी काढला मोर्चा