नागपूर - हिवाळी अधिवेशनच्या पहिल्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस आहे. गुरुवारी सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे आजच्या कामकाजात सभागृहात भाग घ्यायचा की नाही याबाबत विरोधक बैठकीत ठरवतील. परंतु सत्ताधाऱ्यांकडून सोयीचं राजकारण सुरू असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला. तर, सभागृहाचं काम सुरू होण्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवन पायऱ्यांवर उतरत शिंदे सरकार आणि कर्नाटक सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.
बेळगाव कारवार आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे... बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे... सरकार हमको दबाती कर्नाटक को घबराती है... कुंभकर्णाने घेतलं झोपचं सोंग, तिकडे कर्नाटक सरकार मारतंय बोंब... कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध... लोकशाहीचा खून करणार्या सरकारचा धिक्कार असो...कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय...सीमा प्रश्नी भूमिका घ्या नाहीतर खुर्च्या खाली करा... भूखंडाचा श्रीखंड खाणार्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो... अशा घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला आहे. यावेळी, काळ्या पट्टया बांधून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दरम्यान, भाजपच्या आमदार आणि विद्यमान विधानसभा सदस्य मुक्ता टिळक यांचे गुरुवारी निधन झाले. त्यामुळे, आज विधानसभेत त्यांना श्रद्धांजली वाहून आजचे विधानसभा कामकाज बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती आहे. मात्र, तत्पूर्वीच विरोधक कर्नाटक सीमावादाच्या प्रश्नावरुन आक्रमक झाल्याचे दिसून आले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आक्रमक पवित्रा घेत माध्यमांसमोर भूमिका मांडली.
काय म्हणाले अजित पवार
अजित पवार म्हणाले की, भुजबळ माझगाव मतदारसंघातून आमदार होते, मुंबईचे महापौर राहिले आहे. त्यांनी उदाहरण देताना मुंबईचा उल्लेख सोन्याचं अंड देणारी कोंबडी केला. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला. परंतु विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणून काम पाहत होते. त्यांनीही मुंबईला सोन्याच अंड देणारी कोंबडी असा उल्लेख केला होता. इतर भाजपा नेत्यांनीही हा उल्लेख केला होता. मला सभागृहात बोलण्याची संधी मिळाली तर मी कागदे सादर करेन. सभागृहात जयंत पाटील यांनी जे काही वक्तव्य केले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. परंतु सत्तेच्या जोरावर बहुमत वापरून गोंधळ घालायचा. सत्ताधारी-विरोधी पक्ष दोघांनी समन्वयाची भूमिका घेऊन वागलं पाहिजे. सभागृहात महागाई, बेरोजगारी, विदर्भ-मराठवाड्यातील प्रश्नावर चर्चा होण्यासाठी अधिवेशन बोलावलं आहे असं त्यांनी म्हटलं.