“महाराष्ट्रविरोधी कुरघोड्यांनंतर कर्नाटक सरकार राज्याच्या वाटचे पाणी पळविण्याच्या प्रयत्नात”
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 02:42 PM2022-12-30T14:42:13+5:302022-12-30T14:43:01+5:30
राज्याचा पाणी हिस्सा आणि पर्यावरणाला ही धोका निर्माण झाला असल्याचे अजित पवार यांनी सरकारच्या लक्षात आणून दिले.
नागपूर : महाराष्ट्रविरोधी कुरघाड्या कर्नाटक सरकारने आता महाराष्ट्राचे पाणी पळविण्याच्या प्रयत्न सुरु केला असून यामुळे राज्याचा पाणी हिस्सा आणि पर्यावरणाला ही धोका निर्माण झाला आहे. ही बाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून राज्य सरकारच्या लक्षात आणून दिली.
विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, “महाजन आयोगानुसार खानापूर तालुक्यातील ३० गावांचा समावेश महाराष्ट्रात करण्याची शिफारस आहे. कळसा भांडुरा प्रकल्पामुळे गोव्याबरोबरच महाराष्ट्रालाही फटका बसणार आहे. महाराष्ट्रातील विर्डी प्रकल्पाला याचा फटका बसणार आहे. याचमुळे महाराष्ट्र सरकारने देखील याविरोधात न्यायालयात धाव घेणे गरजेचे आहे. कर्नाटक सरकार भाषेबाबत गळचेपी करत असतानाच आता महाजन आयोगानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या खानापूर मधील पाणी स्वतःच्या धारवाड मध्ये वळवू पाहत आहे. महाजन आयोगाचा अहवाल हाच अंतिम असल्याचे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे. तसे असल्यास कळसा भांडुरा प्रकल्पाच्या अखत्यारीत खानापूर तालुक्यातील ही गावे येतात. याचबरोबर या प्रकल्पामुळे पाणी आणि पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होणार आहे.”
महाजन आयोगानुसार खानापूर तालुका हा महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहे. अशा स्थितीत कर्नाटक सरकारने कळसा भांडुरा प्रकल्प हाती घेणे गैर असल्याचा मुद्दा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारच्या लक्षात आणून दिला.