कर्नाटक निकाल; संघप्रणालीच्या विपरीत जाऊन केलेला ‘कॉर्पोरेट’ प्रचार भाजपला भोवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2023 08:00 AM2023-05-14T08:00:00+5:302023-05-14T08:00:02+5:30

Nagpur News कर्नाटकात भाजपने ‘कॉर्पोरेट स्टाईल’ प्रचारावर जास्त भर दिला व त्याचाच फटका पक्षाला बसला. संघप्रणालीच्या विपरीत जात केलेला प्रचार भोवल्याची संघ वर्तुळात चर्चा आहे.

Karnataka Results; 'Corporate' campaign against the union system hit the BJP | कर्नाटक निकाल; संघप्रणालीच्या विपरीत जाऊन केलेला ‘कॉर्पोरेट’ प्रचार भाजपला भोवला

कर्नाटक निकाल; संघप्रणालीच्या विपरीत जाऊन केलेला ‘कॉर्पोरेट’ प्रचार भाजपला भोवला

googlenewsNext

योगेश पांडे

नागपूर : कर्नाटकच्या निकालामुळे भाजपश्रेष्ठींना धक्का बसला असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्येदेखील नाराजीचा सूर दिसून येत आहे. उत्तर प्रदेशप्रमाणे कर्नाटकच्या निवडणुकांत संघ स्वयंसेवक प्रचारात सक्रिय नव्हते. मात्र, मतदानवाढीसाठी स्वयंसेवकांचे प्रयत्न सुरू होते. तळागाळात जाऊन संपर्क करण्यावर संघाचा नेहमी भर असतो. मात्र, कर्नाटकात भाजपने ‘कॉर्पोरेट स्टाईल’ प्रचारावर जास्त भर दिला व त्याचाच फटका पक्षाला बसला. संघप्रणालीच्या विपरीत जात केलेला प्रचार भोवल्याची संघ वर्तुळात चर्चा आहे. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह संघाचे अनेक अखिल भारतीय अधिकारी कर्नाटकातील आहेत हे विशेष.

सद्य:स्थितीत नागपुरात अखिल भारतीय तृतीय वर्ष वर्ग सुरू आहे. कर्नाटकच्या निकालाकडे स्वयंसेवकांचे लक्ष लागले होते. मात्र, हनुमानाचा जयजयकार करत शेवटच्या टप्प्यात पूर्ण जोर लावल्यानंतरदेखील भाजपला अपयश मिळाल्यामुळे स्वयंसेवकांचा उत्साह मावळला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमध्ये भाजप व संघाच्या संपर्क प्रणालीत बरेच अंतर होते. संघ स्वयंसेवकांकडून गृहसंपर्क व लोकांशी प्रत्यक्ष भेट-बैठकांवर नेहमीच भर देण्यात येतो. अगदी ‘ऑनलाइन’ युगातदेखील प्रत्यक्ष बैठका घेऊन लोकांची मते जाणून घेण्यात येतात. प्रचारादरम्यानदेखील अशीच प्रक्रिया भाजपने राबविली पाहिजे, अशी सूचना स्थानिक संघ पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र, भाजपच्या नेत्यांची भिस्त ‘कॉर्पोरेट’ प्रचारावरच राहिली. बऱ्याच मतदारसंघांमध्ये स्थानिक भाजप उमेदवारांचा जनतेशी ‘कनेक्ट’ नसल्याचे चित्र होते. याचाच फटका भाजपला बसला.

प्रचारापेक्षा मतदानवाढीवरच भर

उत्तर प्रदेशमध्ये संघाकडून प्रत्येक घरातून मतदान व्हावे यासाठी प्रयत्न झाले होते व स्वयंसेवक प्रचारातदेखील सक्रिय होते. आसाम व ईशान्येकडील राज्यांमध्येदेखील स्वयंसेवक बऱ्यापैकी सक्रिय होते. कर्नाटकात मतदानवाढीवर भर देण्यात आला. मात्र, प्रचारासाठी केवळ मोजक्या जागांवरच स्वयंसेवक सक्रिय होते. हुबली-धारवाड येथे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्याविरोधात उभे असलेले भाजपचे उमेदवार महेश तेंगिकाई यांच्यासाठी संघ स्वयंसेवकांनी गृहसंपर्क मोहीमच राबविली होती. तेथे भाजपला यश मिळाले.

संघ लिंगायतविरोधी असल्याचा प्रचार

निवडणुकांदरम्यान संघ लिंगायत व वोक्कालिगा या दोन समाजांविरोधात असल्याचा विरोधकांकडून प्रचार करण्यात आला होता. काँग्रेसच्या प्रस्थापित उमेदवारांविरोधात या दोन्ही समाजातील नवख्या उमेदवारांना तिकीट देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. अगदी भाजपचे विधान परिषद आमदार ए.एच. विश्वनाथ यांनी सार्वजनिकपणे यावर भाष्य केले. या दोन्ही समाजातील नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा त्यांनी आरोप केला होता. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांकडूनदेखील आपल्या सभांमध्ये केवळ भाजपवरच नव्हेतर, संघावरदेखील टीका करण्यात आली. संघावरच आरोप झाल्यामुळे भाजपलादेखील काही जागांवर बॅकफूटवर जावे लागले.

Web Title: Karnataka Results; 'Corporate' campaign against the union system hit the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.