नागपूर: लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी महाराष्ट्रात कर्नाटक, तेलंगणाचा फॉम्युर्ला वापरला जाईल. काँग्रेस थेट जनतेत जाईल. लोकांच्या मनातील उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. सर्व नेत्यांना एकत्र करून त्यांच्यातील मतभेद दूर करून लोकांमध्ये एकतेचा मेसेज दिला जाईल. काँग्रेसचे जिंकण्यासाठी मैदानात उतरल्याचा मेसेज जनतेत गेला की लोकही काँग्रेसला साथ देऊन विजयी करतील, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी रमेश चेन्नीथला हे काँग्रेसच्या विभागीय बैठका घेत आहेत. गुरुवारी अमरावतीची बैठक आटोपल्यावर चेन्नीथला यांनी शुक्रवारी नागपुरात लोकमतशी विशेष बातचित केली. ते म्हणाले, उमेदवारीबाबत ब्लॉक स्तरावरील कार्यकर्त्याचे मतही ऐकूण घेतले जात आहे. थेट जनतेचे मतही विचारात घेतले जात आहे. मतदारांवर उमेदवार लादला जाणार नाही, जिंकण्याची क्षमता पाहूनच उमेदवारी दिली जाईल, याची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत. जागा वाटपाची पहिल्या टप्प्यातील चर्चा संपली आहे. ‘विनिंग फाम्युर्ला’ विचारात घेऊनच कोणती जागा कुणी लढवावी, हे निश्चित केले जाईल. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बरेच लोक सोडून गेले. मात्र, त्याने काहीच फरक पडणार नाही. उलट या दोन नेत्यांचे जनसमर्थन वाढले आहे, असा दावाही चेन्नीथला यांनी केला. २२ जानेवारी रोजी अयोध्येतील प्रभु श्री राम यांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर लगेच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.
कुणीही काँग्रेस सोडून जाणार नाहीकाँग्रेसला कमजोर करण्यासाठी भाजपकडून ईडी, सीबीआयचा वापर केला जात आहे. मात्र, कितीही दबाव आला तरी कुणीही काँग्रेस सोडून जाणार नाही, असा दावा त्यांनी केला. यापूर्वी जे गेले ते स्वार्थासाठी गेले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एकत्र लढले तर नेत्यांचाच फायदासध्या केंद्रात व राज्यात काँग्रेसची सत्ता नाही. त्यामुळे नेत्यांना आपसात भांडून हाती काहीच लागणार नाही. एकत्र येऊन लढले व सत्ता आली तर नेत्यांनाच त्याचा फायदा होईल, असे सांगत चेन्नीथला यांनी गटबाजी करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचे कान टोचले. सरकार विरोधात जनतेच्या मनात रोष आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी एकत्र येऊन सज्ज राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरूमहाविकास आघाडीत सामील होण्यासाठी सर्वांना दारे खुली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशीही चर्चा सुरू आहे. सकारात्मक तोडगा निघेल, असेही चेन्नीथला यांनी स्पष्ट केले.
इतिहासात विदर्भाची साथ, म्हणूनच येथून सुरुवातइतिहासात विदर्भाने काँग्रेसला साथ दिली आहे. त्यामुळे विदर्भापासूनच आढावा बैठकांची सुरुवात करण्यात आली आहे. अमरावती येथील बैठक आटोपली. शनिवारी गडचिरोली येथे बैठक होत आहे. राज्यभरात अशा सहा बैठका होतील.