धापेवाडा : विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा येथे २ व ३ डिसेंबरला होणारी रथयात्रा व मंडई कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आल्याने गावकऱ्यांनी साधेपणाने कार्तिक महोत्सव साजरा केला. भव्य रथाची श्री रुद्रप्रतापसिंह पवार यांच्या वाड्यात पौर्णिमेच्या द्वितीयेला रात्री पूजा करण्यात आली. तसेच जिल्हा प्रशासनाच्या रथयात्रा स्थगितीच्या आदेशाचे पालन करत रथाचे गावभ्रमण रद्द करण्यात आले. परिसरातील ही सर्वांत मोठी मंडई असून कार्तिक पौर्णिमेच्या द्वितीया व तृतीयेला येथे रथाचे गावभर भ्रमण करण्यात येते. मात्र कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रथयात्रा रद्द करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे पंचमीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.
गुरुदेव मंडळाची सामुदायिक प्रार्थना
श्री गुरुदेव सेवा मंडळ धापेवाडातर्फे दरवर्षी धापेवाडा येथे राज्यस्तरीय भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. कोरोनामुळे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने मंडळातर्फे बाजार चौक परिसरात फक्त सामुदायिक प्रार्थना व पाच भजने म्हणत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना आदरांजली अर्पण करण्यात आली.