लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काश्मीर हा भारताचा अविभाज्य हिस्सा असून हेच वास्तव आहे. सत्याच्या मागे शक्ती असेल तर जग त्याला मान्यता देते. काही उपद्रवी तत्त्व काश्मीरमध्ये सातत्याने अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. ज्यांना जशी भाषा समजते, त्यातच उत्तर दिले पाहिजे. काश्मीरमध्ये उपद्रवींवर नियंत्रण आणण्यासाठी शक्ती व युक्ती दोघांचाही वापर झाला पाहिजे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. जम्मू काश्मीर स्टडी सेंटरतर्फे उपराजधानीत चार दिवसीय सप्तसिंधू जम्मू काश्मीर लद्दाख महाउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते गुरुवारी बोलत होते.डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मिझोरमचे राज्यपाल निर्भय शर्मा, जम्मू काश्मीर स्टडी सेंटरचे राष्ट्रीय अध्यक्ष जवाहरलाल कौल, नागपूर अध्यक्षा व कुटुंब न्यायालयाच्या सेवानिवृत्त प्रधान न्यायाधीश मीरा खडक्कार, चारुदत्त कहू हे प्रामुख्याने उपस्थित होते. देशविदेशात वारंवार काश्मीर समस्येचा उल्लेख होतो. मात्र प्रत्यक्षात हा उल्लेखच चुकीचा आहे. ती संपूर्ण भारताचीच समस्या आहे. खरी समस्या म्हणजे भारतातील नागरिक व त्यांची विचार करण्याची दिशा ही आहे. आपल्यामध्ये आपण सर्व एक आहोत ही भावना असूनही आपण तिची अंमलबजावणी करत नाही. एकतेचा आपल्याला विसर पडला असून याचाच फायदा समाजविघातक तत्त्व घेतात. लोकांमधील वैचारिक दरी आणखी कशी वाढेल यासाठी ते प्रयत्न करतात. लोकदेखील त्यांनी रचलेल्या असत्याच्या चक्रव्यूहामध्ये फसतात, असे डॉ.भागवत म्हणाले. आपल्या देशातील सत्य, इतिहास आपल्याला माहितीच नाही व जाणण्याचा प्रयत्नदेखील करत नाही. खऱ्या अर्थाने अशा विघातक शक्तींना रोखण्यासाठी एकात्मतेचा भाव वाढला पाहिजे. शक्ती व युक्ती यांच्या पाठीशी भक्तीचे सामर्थ्य उभे ठाकले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.भागवत यांनी केले. मीरा खडक्कार यांनी संचालन केले. रेणुका देशकर यांनी संचालन केले तर अमर कुलकर्णी यांनी वैयक्तिक गीत सादर केले. यावेळी काश्मीरमधून आलेल्या विद्यार्थिनींनी विशेष गीताचे सादरीकरण केले.ढोंगी धर्मनिरपेक्षता संपवावी लागेल : निर्भय शर्मा