सहा डिझाईनची निवड : राष्ट्रीयस्तरावर घेण्यात आली खुली स्पर्धा नागपूर : कस्तूरचंद पार्क हे शहरातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. शहरातील ऐतिहासिक वारसा स्थळाच्या यादीत कस्तूरचंद पार्क हे स्थळ वन ग्रेडमध्ये सामील आहे. त्यामुळे कस्तूरचंद पार्कचा वारसा जतनासोबतच तो आणखी कसा विकसित करता येईल त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे राष्ट्रीयस्तरावर नुकतीच एक खुली स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतून देशभरातून एकूण सहा (डिझाईन) आराखड्याची निवड करण्यात आली आहे. हा आराखडा जिल्हा हेरिटेज कमिटीला सादर करण्यात आला आहे. यापैकी लवकरच एका डिझाईनची निवड करून त्याप्रमाणे कस्तूरचंद पार्कचे जतन केले जाईल. कस्तूरचंद पार्क हे शहरातील मध्यवर्ती भागात असलेले एक प्रचंड मोठे असे मैदान आहे. त्याला ऐतिहासिक संदर्भ आहे. या विस्तीर्ण मैदानाचा उपयोग विविध खेळ, राजकीय जाहीर सभा, औद्योगिक प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, रावण दहन आदींसह विविध कामांसाठी केला जातो. त्यामुळे अनेकदा मैदानाचे विद्रुपीकरणही केले जाते. यातच मैदान परिसरात अतिक्रमणही वाढले आहे. या सर्वांचा विचार करता कस्तूरचंद पार्कचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन येथील खुल्या जागेचा वापर व्हावा आणि याचे ऐतिहासिक महत्त्व आणखी अधोरेखित व्हावे, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या जागेचा वापर कसा करता येईल, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने राष्ट्रीयस्तरावर खुली स्पर्धा आयोजित केली. गेल्या जून महिन्यात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यासंदर्भात जाहीर नोटीससुद्धा काढण्यात आली. यामध्ये कस्तूरचंद पार्कचे मैदान लहान मुलांचा खेळण्याचा भाग, प्ले ग्राऊंड, जाहीर सभा, सांस्कृतिक कार्यक्रम, वॉकिंग ट्रॅक, पार्किंग, सार्वजनिक शौचालय व इतर सुविधा आणि आर्किटेक्चरल लायटिंग अशा सात भागात विभाजित करून त्याचे पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशन करावयाचे होते. यात आर्किटेक्ट डिझायनर, विद्यार्थी, अशासकीय संघटना व सर्वसामान्य नागरिक यांनी उत्स्फूर्त भाग घेतला. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, आर्किटेक्ट पी.के. दास (मुंबई), आर्किटेक्ट अशोक मोखा आणि एम.एम. कॉलेज आॅफ आर्किटेक्चरचे प्रिन्सिपल प्रो. उज्ज्वल चक्रदेव यांच्या निवड समितीने देशभरातून सहा डिझाईनची निवड केली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे हे सहाही डिझाईन जिल्हा हेरिटेज कमिटीकडे सादर करण्यात आले आहेत. जिल्हा हेरिटेज कमिटी याची पाहणी करून लवकरच यापैकी एकाची निवड करणार आहे. (प्रतिनिधी)
कस्तूरचंद पार्कचा वारसा होणार जतन
By admin | Published: November 04, 2016 2:27 AM